Sushant Singh Rajput Case: सुशांत प्रकरणात सीबीआयनं काय दिवे लावले ते पाहिले; शरद पवारांचा टोला
By कुणाल गवाणकर | Published: September 29, 2020 03:41 PM2020-09-29T15:41:04+5:302020-09-29T15:53:08+5:30
जवळपास दीड महिना होऊनही सीबीआयचे हात रिकामेच
मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा तपास करणाऱ्या सीबीआयच्या हाती अद्याप तरी ठोस काही हाती लागलेलं नाही. सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयच्या हाती तपास देऊन जवळपास दीड महिना होत आला आहे. यावर भाष्य करताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सीबीआयवर सडकून टीका केली. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी वेगळी तपास यंत्रणा नेमली गेली. तिनं काय दिवे लावले ते पाहिले, अशा शब्दांत पवार यांनी सीबीआयच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
शरद पवारांनी एनडीएमध्ये यावं. त्यांना सत्तेत वाटा मिळेल, अशी थेट ऑफर देणाऱ्या केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा शरद पवारांनी खरपूस समाचार घेतला. 'आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा एक तरी आमदार निवडून येतो का? आठवले बोलत असतात. मार्गदर्शन करत असतात. त्यांना संसदेत आणि संसदेबाहेरही कोणी गांभीर्यानं घेत नाही,' असा टोला शरद पवारांनी लगावला.
सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. त्यावरून खासदार उदयनराजे, संभाजीराजे छत्रपती यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यावरही शरद पवारांनी भाष्य केलं. 'भाजपकडून उदयनराजेंची निवड राज्यसभेवर करण्यात आली. तर संभाजीराजे छत्रपती यांची नेमणूक राष्ट्रपतींकडून करण्यात आली आहे. पण ते राष्ट्रपती नियुक्त सदस्य असले, तरी त्यांचं नाव पंतप्रधानांकडून सुचवण्यात आलं आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी मराठा आरक्षण प्रकरणात सहकार्य करावं,' असं आवाहन शरद पवारांनी केलं.