घटनाबदलाची हिंमत कोणातही नाही- सुशीलकुमार शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 03:29 AM2018-10-30T03:29:04+5:302018-10-30T06:37:02+5:30
अधूनमधून काही जणांकडून घटनेत बदल करू, असे ऐकायला मिळते. प्रत्यक्षात कोणाचीही घटनाबदलाची हिंमत नाही, अशा शब्दांत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला.
पुणे : ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात वैचारिक वाद होतेच; मात्र घटना समिती स्थापन झाल्यावर गांधींनी आंबेडकरांचे नाव सुचवले आणि भारताला एकसंध राज्यघटना मिळाली. भारतीय संविधान प्रखर, सर्वांना न्याय देणारे आहे. अधूनमधून काही जणांकडून घटनेत बदल करू, असे ऐकायला मिळते. प्रत्यक्षात कोणाचीही घटनाबदलाची हिंमत नाही, अशा शब्दांत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला.
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या सभागृहात सोमवारी नारायण सुर्वे स्मृती पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे यंदाचा नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ कवी, साहित्यिक आणि विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांना शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे व प्रमुख पाहुणे म्हणून विखे-पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अशोक विखे-पाटील उपस्थित होते.
नारायण सुर्वे भला माणूस पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गिरीश गांधी, ज्येष्ठ साहित्यिक विजय खरे यांना नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार, नारायण सुर्वे स्नेहबंध पुरस्कार रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी कॉलेजचे प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले यांना, नारायण सुर्वे सनद पुरस्कार प्रसिद्ध कवयित्री कल्पना दुधाळ यांना आणि नारायण सुर्वे कामगारभूषण पुरस्कार श्री खंडेराय प्रतिष्ठान शिक्षण संस्थेचे संस्थापक गणपतराव बालवडकर यांना प्रदान करण्यात आले.
शिंदे म्हणाले, ‘काळानुसार समाज बदलतो, विचार बदलतात. त्याप्रमाणे धर्माची व्याख्याही बदलायला हवी. धर्माचा अन्वयार्थ बदलण्याची ताकद क्रांतिकारी नवकवींमध्ये आहे. या कवींवर आंबेडकरवादी शिक्का करण्याचे काम काही जण करतात, प्रत्यक्षात परिस्थिती तशी नाही. आंबेडकर केवळ दलितांचे नेते नव्हते. त्यांनी कायम दूरदृष्टीने आणि सर्वसमावेशक विचार केला.’
यशवंत मनोहर म्हणाले, ‘सुशीलकुमार शिंदे सुसंस्कृत राजकारणी आणि भल्या माणसांचे भले करणारा भला माणूस आहे. असे राजकारणी यापुढील काळात दिसणार नाहीत. सध्याच्या काळात सभ्यपणा राजकारणाला कळत नाही आणि परवडतही नाही. लोकांनी सुसंस्कृत राजकारणाची परंपराच सोडून दिली आहे. त्या काळात कवितेचा मातीशी संबंध उरला नव्हता. नवकवितेमध्ये आम्ही आम्हालाच सापडेनासे झालो होतो. जगण्याच्या प्रश्नांचे प्रतिबिंब कवितेत सापडत नव्हते. त्यावेळी नारायण सुर्वे आपली कविता घेऊन पुढे आले. ते खºया अर्थाने युगप्रवर्तक कवी होते. संविधान आले नसते तर आम्ही अंधारात मिटून गेलो असतो, आमच्या प्रतिभेला धुमारे फुटले नसते.’
रामदास फुटाणे म्हणाले, ‘कवी प्रज्ञा आणि प्रतिभावंत असतीलही; मात्र अनुभूती असलेले कवी शून्य आहेत. देश तोडण्याचे प्रयत्न अनेक वर्षे सुरू आहे. माणसाने जाती, धर्म निर्माण केले आणि ते जपण्यासाठी रक्तपात होतो. हजारो वर्षांचा संघर्ष मोडून काढून देश जोडण्याचे काम कवींना, साहित्यिकांना करायचे आहे. केवळ, देशाचा विचार न करता जगातील शांतताप्रिय माणसे जोडण्याचे काम साहित्यिकांना करायचे आहे.’ पुरस्कारार्थींनी मनोगत व्यक्त केले. सचिन ईटकर यांनी प्रास्ताविक केले. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले. संदीप सांगळे यांनी आभार मानले.
भांग प्यायले होते?
संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आजच मी डॉ. अरुणा ढेरे यांची भेट घेऊन अभिनंदन केले. अध्यक्षीय भाषणामध्ये इंदिरा संत यांचा उल्लेख करण्याची मी त्यांना विनंती केली. रसिकांनी त्यावेळी संत यांना पराभूत केले आणि रमेश मंत्री यांना निवडून दिले. आमच्या महाराष्टÑाची अभिरुची कोणत्या कंपनीची भांग पिते, असा सवाल मनोहर यांनी उपस्थित केला.