“कृपा करुन शिक्षकांना बाजारात...”; CM शिंदेंच्या सभेनंतर पैसे वाटल्याचा ठाकरे गटाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 01:46 PM2024-06-23T13:46:16+5:302024-06-23T13:51:02+5:30

Nashik Teacher Constituency Election : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून पैसे वाटप झाल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.

Sushma Andhare Allegation of distribution of money by Mahayuti for election of Nashik teacher constituency | “कृपा करुन शिक्षकांना बाजारात...”; CM शिंदेंच्या सभेनंतर पैसे वाटल्याचा ठाकरे गटाचा आरोप

“कृपा करुन शिक्षकांना बाजारात...”; CM शिंदेंच्या सभेनंतर पैसे वाटल्याचा ठाकरे गटाचा आरोप

Sushma Andhare Allegation  : थोड्याच दिवसात शिक्षक आणि पदवीवर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. त्यादरम्यान आता शिंदे गटाने शिक्षकांना पैसे वाटप केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेनंतर शिंदे गटाने जळगावमध्ये पैसे वाटल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला. शिंदे गटाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.  पैसे वाटप झाल्याचा खळबळजनक आरोप करत सुषमा अंधारे यांनी एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. खासदार संजय राऊत यांनीही या प्रकारावरुन टीका केली आहे.

नाशिक शिक्षक मतदार संघासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मैदानात उतरले आहेत. नाशिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक २६ जून रोजी होणार आहे. यानिमित्ताने मुख्ममंत्री एकनाथ शिंदे यांची शनिवारी जळगाव येथे नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार किशोर दराडे यांच्यासाठी प्रचारसभा झाली. या सभेला जळगाव-धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थेतील संस्थाचालक तसेच मुख्याध्यापक कर्मचारी या सभेला उपस्थित होते. या सभेनंतर जळगाव जिल्ह्यातून आलेल्या शिक्षकांना पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. निवडणूक आयोग कुठं आहे? असा सवालही सुषमा अंधारे यांनी विचारला.

सुषमा अंधारे यांनी पैसे वाटपाचा व्हिडीओ शेअर करत महायुतीवर गंभीर आरोप केले. “महायुतीचे उमेदवार दराडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जळगावातील आदित्य लॉन्स येथे सभा झाली. या सभेनंतर जिल्ह्यातील प्रत्येक शाळेचे शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्थाचालक यांना पैसे वाटप करण्यात आले. निवडणूक आयोग कुठं आहे?, असे सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.

निवडणूक आयोग उघड्या डोळ्यांनी भ्रष्टाचार पाहत आहे - संजय राऊत 

"सुषमा अंधारे यांनी यासंदर्भातील व्हिडीओ ट्वीट केला. तुम्ही या थरापर्यंत खाली पडू नका. लोकसभा निवडणुकीत तुम्ही हेलिकॉप्टरमधून २० कोटी रुपये कशे उतरवले हे सगळ्यांनी पाहिलं. कृपा करुन पदवीधर आणि शिक्षक यांना तुम्ही बाजारात उभं करुन नका. या सगळ्यासाठी देशातील निवडणूक आयोग जबाबदार आहे. निवडणूक आयोग उघड्या डोळ्यांनी व्याभिचार आणि भ्रष्टाचार पाहत आहे. लोकशाहीचे वस्त्रहरण होताना पाहत आहे," अशी टीका संजय राऊत यांनी केली.
 

Web Title: Sushma Andhare Allegation of distribution of money by Mahayuti for election of Nashik teacher constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.