“देवेंद्रजी, गृहमंत्री नाही तर वकील म्हणून ‘या’ प्रश्नांची उत्तरे द्या”; सुषमा अंधारे चॅलेंज
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 03:09 PM2023-06-01T15:09:40+5:302023-06-01T15:11:19+5:30
Sushma Andhare-Devendra Fadnavis: संजय शिरसाट यांना क्लीन चिट दिल्यानंतर सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना काही प्रश्न केले आहेत.
Sushma Andhare-Devendra Fadnavis: ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. मात्र, याप्रकरणी पोलिसांनी संजय शिरसाट यांना क्लीन चिट दिली. याप्रकरणी आता सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना चॅलेंज देत, देवेंद्रजी तुम्ही गृहमंत्री आहात. गृहमंत्री म्हणून नाही तर वकील म्हणून तरी प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
मला कुठलीच माहिती न देता, विचारपूस न करता हे प्रकरण निकाली काढण्यात आले. देवेंद्र फडणवीस संवेदनशील व्यक्ती आहेत. गृहमंत्री म्हणून नाही तर वकील म्हणून त्यांना या सर्व गोष्टी कळत असतील. त्यांनी वकील म्हणून माझ्या प्रश्नांची उत्तर द्यावीत, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सरकारची बाजू घेतील. पण म्हणून मी वकील म्हणून त्यांना प्रश्न विचारते आहे. त्यांनी वकील म्हणून उत्तरं द्यावीत, असेही सुषमा अंधारे यांनी सांगितले.
मी माझी लढाई चालूच ठेवणार आहे
या प्रकरणातील सर्व उत्तर फडवीसांनी दिली पाहिजेत. देवेंद्र फडणवीस अभ्यासू आहेत. त्यामुळे त्यांच्याशी बोलते. फडणवीस आपण गृहमंत्री आहात, संजय शिरसाट प्रकरणात जी चौकशी समिती नेमली त्याबद्दल काय माहिती आहे का? छत्रपती संभाजीनगर प्रकरणात त्या आमदाराला क्लीन चिट दिली, असे सांगितले आहे. ही क्लीन चीट कशी दिली गेली, याबाबत फडणवीसांनी खुलासा करावा, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. तसेच महिलांना ट्रोल करण्यात त्यांना फार मोठी मर्दगिरी वाटते. फडणवीसांनी तुम्ही त्यांना काय समज द्याल का? गृहमंत्री म्हणून तुम्हीच उत्तर दिली पाहिजेत, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
दरम्यान, हा फक्त ट्रेलर आहे. मी माझी लढाई चालूच ठेवणार आहे. प्रसंगी छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊन लढाई चालू ठेवणार आहे. गेली ८-१० दिवस ब्रेक घेतला होता. त्यामुळे या दिवसात काय घडले ते माहिती नाही, असे सुषमा अंधारे यांनी सांगितले. तसेच तानाजी सावंतावर नंतर सविस्तर बोलेन. असभ्य लोकांशी बोलत नाही, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.