“आरक्षण नसताना करून दाखवलं!”; शरद पोंक्षेंना सुषमा अंधारेंचे सडकून प्रत्युत्तर, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 07:06 PM2023-07-28T19:06:47+5:302023-07-28T19:08:42+5:30

Sharad Ponkshe Vs Sushma Andhare: शरदराव कौतुक करताना माणूस म्हणून कसे क्षुद्र किंवा नालायक आहोत, हे दाखवायलाच हवे का, अशी विचारणा सुषमा अंधारेंनी केली आहे.

sushma andhare replied and criticized actor sharad ponkshe over post | “आरक्षण नसताना करून दाखवलं!”; शरद पोंक्षेंना सुषमा अंधारेंचे सडकून प्रत्युत्तर, म्हणाल्या...

“आरक्षण नसताना करून दाखवलं!”; शरद पोंक्षेंना सुषमा अंधारेंचे सडकून प्रत्युत्तर, म्हणाल्या...

googlenewsNext

Sharad Ponkshe Vs Sushma Andhare: मराठी चित्रपटसृष्टी, नाटक, मालिकांमध्ये काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांची लेक सिद्धी पोंक्षे पायलट झाली. यानंतर शरद पोंक्षे यांनी लेकीचे कौतुक करणारी एक पोस्ट लिहिली. यावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाष्य करताना सडकून टीका केली आहे. 

सुषमा अंधारे यांनी शरद पोंक्षे यांची मुलगी पायलट झाल्याबाबत अभिनंदन करतानाच तीव्र शब्दांत ताशेरेही ओढले आहेत. एरवी मला दादा भाऊ असे बोलून सुरुवात करायची सवय आहे . मात्र निश्चितपणे तुम्हाला ते आवडणार नाही.  कारण तुमची माझी ना जात एक आहे... ना गोत्र एक आहे. कारण माणसा-माणसात भेद निर्माण करणारा जो सनातनी धर्म तुम्ही सांगत आहात तो कदाचित मला मान्य होणार नाही आणि प्रबोधनकारांनी किंवा शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब यांनी किंवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब सांगत असलेले सर्व समावेशक हिंदुत्व तुम्हाला कळणार नाही. पण शरदराव कौतुक करताना सुध्दा  माणूस म्हणून कसे आपण क्षुद्र किंवा नालायक आहोत हे दाखवायलाच हवे का, अशी विचारणा सुषमा अंधारे यांनी केली आहे. 

ज्या आरक्षणाबद्दल तुम्ही प्रचंड तिरस्कृतपणाने लिहिलत ना...

शरदराव, भेकड आणि भित्र्या माणसाची अहिंसा ही अहिंसा मानली जात नाही. हे माहिती असेलच तुम्हाला.  उलट ज्याच्यामध्ये कमालीचे बाहुबल आहे,  भल्या-भल्यांना सहज धूळ चारण्याची धमक आहे पण तरीही जो आपल्या बलाचा प्रयोग निष्कारण करत नाही तो खऱ्या अर्थाने अहिंसा मानणारा.  हे इथे लिहिण्याचे कारण म्हणजे माझ्या राजकीय कारकिर्दीला अर्थात मी शिवसेनेत प्रवेश केला या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. मला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. ना कुठले जातीय किंवा आर्थिक पाठबळ आहे. पण कुठल्याही जातीय आर्थिक आरक्षणाशिवाय माझ्या गुणवत्तेने मी काय करू शकते हे एक वर्षात तुमच्यासह महाराष्ट्राने बघितलेच आहे. अर्थात् कुठलेही जातीय आर्थिक किंवा वांशिक  निकष न लावता निव्वळ माझ्यातल्या गुणवत्तेची पारख करत मला राज्यभर काम करण्याची संधी देणारे पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा मानवतावादी दृष्टिकोनही तितकाच महत्त्वाचा आहे. पण हे तुमच्यासारख्या माणूसद्वेषष्ट्यांना अजिबात कळणार नाही. आणि हो ज्या आरक्षणाबद्दल तुम्ही प्रचंड तिरस्कृतपणाने लिहिलत ना, त्या आरक्षणाची लाभार्थी होणे मला सहज शक्य असताना सुद्धा माझे संपूर्ण शिक्षण मी खुल्या प्रवर्गातून पूर्ण केले आहे, असे सुषमा अंधारे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे 

माझे कौतुक तुमच्यापेक्षा दुप्पट नाही का?  

आणि हो नुसते पूर्ण केले नाही तर विशेष प्राविण्यासह आणि विद्यापीठ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील तब्बल पाच सुवर्णपदकांसह पूर्ण केले आहे. त्यामुळे आरक्षण लाभार्थी होणे शक्य असतानाही ते नाकारण्याची हिंमत जर मी करू शकत असेल तर तुमच्यासारख्या माणसाला (?) आरसा दाखवण्याची हिंमत मी करूच शकते. नाही म्हणजे माझे कौतुक तुमच्या पेक्षा दुप्पट नाही का? अहो शरदराव कुणी कोणत्या जातीत जन्माला यावे यासाठी कुठेही अर्ज केलेला नसतो हे माहिती असेलच तुम्हाला त्यामुळे जी गोष्ट मिळवण्यामध्ये आपले कसलेही स्वकर्तृत्व नाही त्याची जशी लाज असू नये तसा माजही असू नये याचे भान असेलच तुम्हाला, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली. 

दरम्यान, शरद राव तुम्ही एका दुर्धर आजारातून बरे झालात. पण या आजारादरम्यान उपचार घेत असताना रक्त लघवी तपासण्याचे ठिकाण असेल, मेडिकल स्टोअरवर काम करणारी मुले असतील,  शस्त्रक्रिया दरम्यान आवश्यकता असणारे भुलतज्ज्ञ, केमोथेरपी देणारे डॉक्टर्स,  रक्ताची गरजच पडली असेल तर रक्तपेढीत काम करणारे कर्मचारी किंवा दिवस रात्र सेवा करणाऱ्या नर्सेस यांच्या जाती तुम्हाला माहिती होत्या का हो... असो बोलण्यासारखे बरेच आहे.. पण तूर्तास एवढेच..! लवकर बरे व्हा..!! जातविषयक पित्त वारंवार उफाळून येत असेल तर बुद्ध गुरुनानक महावीर कबीर संत ज्ञानेश्वर तुकोबाराय यांच्या विचारांचा काढा नियमित घेत चला खात्रीने पित्त असे उफाळून येणार नाही, या शब्दांत सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्टमधून शरद पोंक्षे यांच्यावर सडकून टीका केली. 

 

Web Title: sushma andhare replied and criticized actor sharad ponkshe over post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.