Sushma Andhare : "...तर महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा, मुख्यमंत्र्यांनी तानाजी सावंतांचा राजीनामा घ्यावा"
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 03:27 PM2023-10-03T15:27:16+5:302023-10-03T15:36:19+5:30
Sushma Andhare Slams Tanaji Sawant : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आरोग्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा राजीनामा घ्यावा असं देखील म्हटलं आहे.
नांदेडमध्ये 24 तासांत 24 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यात नवजात बालकांचाही समावेश आहे. या घटनेवरुन आरोग्य यंत्रणेवर जोरदार टीका करण्यात येत आहे. अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. याच दरम्यान ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आरोग्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा राजीनामा घ्यावा असं देखील म्हटलं आहे.
"आरोग्यमंत्री म्हणून तानाजी सावंत यांची कामगिरी निराशाजनक नाही तर चिंताजनक आहे. आरोग्यदायी महाराष्ट्रासाठी एकनाथ शिंदे यांनी तात्काळ तानाजी सावंतांचा राजीनामा घ्यायला हवा" अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. यासोबतच आम्ही मृतांच्या नातेवाईकांना 5-10 लाख मदत दिली, असं म्हणून गेलेले जीव परत येत नाहीत असं देखील म्हटलं आहे. सुषमा अंधारे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
“आम्ही मृतांच्या नातेवाईकांना ५-१० लाख मदत दिली, असं म्हणून गेलेले जीव परत येत नाहीत.”
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 3, 2023
- सुषमाताई अंधारे, शिवसेना उपनेत्या आणि प्रवक्त्या@andharesushamapic.twitter.com/M9Eh0ijHJF
"नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू होणं धक्कादायक प्रकार आहे. काही दिवसांपूर्वी ठाण्यामध्ये अशाच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात देखील 18 जणांचा मृत्यू झाला होता. या एकूण सगळ्या घडामोडी पाहता आरोग्यमंत्री म्हणून तानाजी सावंत हे अयशस्वी ठरत आहेत."
"महाराष्ट्राचं आरोग्य खातं अशा आरोग्यमंत्र्यांच्या हातात दिलं तर ही महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा असेल हे मुख्यमंत्र्यांनी समजून घ्यावं. आम्ही मृतांच्या नातेवाईकांना 5-10 लाख मदत दिली, असं म्हणून गेलेले जीव परत येत नाहीत. कृपया या घटनेचं गांभीर्य मुख्यमंत्र्यांनी ओळखावं" असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
"भाजपा प्रचारावर हजारो कोटी खर्च करते पण मुलांच्या औषधांसाठी पैसे नाहीत?"
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देखील नांदेड घटनेवरून भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "महाराष्ट्रातील नांदेड येथील शासकीय रुग्णालयात औषधांच्या कमतरतेमुळे 12 नवजात बालकांसह 24 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. मी सर्व शोकग्रस्त कुटुंबांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो. भाजपा सरकार आपल्या प्रचारावर हजारो कोटी रुपये खर्च करते, पण मुलांच्या औषधांसाठी पैसे नाहीत? भाजपाच्या नजरेत गरिबांच्या जीवाची किंमत नाही" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.