"ए इज इक्वल टू बी, बी ईज इक्वल टू सी इट मिन्स..," निकालानंतर अंधांरेंनी फॉर्म्युलाच सांगितला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 09:13 PM2023-02-18T21:13:09+5:302023-02-18T21:14:33+5:30
निवडणूक आयोग केंद्र सरकारच्या अधीन असतो. केंद्र सरकार सध्या भाजपचं आहे, सुषमा अंधारे यांचं वक्तव्य. पाहा व्हिडीओ.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण आणि पक्षाचं ‘शिवसेना’ हे नाव मिळालं आहे. निवडणूक आयोगानं यासंदर्भातील निर्णय दिला. भारतीय निवडणूक आयोगानं शिवसेनेची सध्याची घटना लोकशाहीविरोधी असल्याचे निरीक्षण नोंदवलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे. यानंतर सुषमा अंधारे यांनी संताप व्यक्त केलाय.
“निवडणूक आयोग केंद्र सरकारच्या अधीन असतो. केंद्र सरकार सध्या भाजपचं आहे. त्यामुळे ए इज इक्वल टू बी, बी ईज इक्वल टू सी इट मिन्स दॅड ए इज इक्वल टू सी. हे स्पष्ट आहे की भाजपच्या आदेशानं आणि आशीर्वादानं कालचा आदेश आलेला आहे. त्यामुळे आम्ही त्याला अंतिम मानत नाही,” असं सुषमा अंधारे म्हणाल्या. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी यावर भाष्य केलं.
“पक्षाचं नाव आणि राजकारण प्रत्येकासाठी महत्त्वाचं असतं. प्रतीकांचं राजकरण महत्त्वाचं असतं. पण त्यापलिकडे जाऊन मूल्याधिष्ठीत राजकारणही महत्त्वाचं असतं. शिवसेनेनं लोकांच्या मनात काही मूल्य रुजवलेली आहेत. ज्यात मराठी माणसाचं हित, तोंडात राम आणि हाताला काम हे मूल्य महत्त्वाचं आहे. मराठी अस्मिता, मराठी बाणा शिवसेनेने कायमच जपलाय. त्या सर्व शिवसैनिकांची नाळ खोक्यांशी जोडलेली नाही, सत्तेशी जोडलेली नाही. त्यांची नाळ मातोश्री, सेनाभवन आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाशी जोडली आहे. त्यामुळे याचा आम्हाला काही फरक पडतो असं वाटत नाही. आम्ही या सर्वांसाठी मानसिकरित्या तयार आहोत,” असंही त्या म्हणाल्या.
उद्धव ठाकरेंनीही केलं संबोधित
कट कारस्थानाचं राजकारण सुरू आहे. शिवसेना संपवण्याचं काम सुरु आहे. मात्र शिवसेना संपवता येणार नाही. धनुष्यबाण पेलायला मर्द लागतो, असं म्हणत आता लढाई सुरु झालीय, असं उद्धव ठाकरे म्हणाले. “तसेच आज माझ्याकडे काहीच नाही, परंतु मी खचलेलो नाही, खचणारही नाही, असं म्हणताना उद्धव ठाकरे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. आजपासूनच निवडणुकांच्या तयारीला लागा, चोरांचा आणि चोर बाजारांचा आपण नायनाट करू,” असा आदेश देखील उद्धव ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिकांना दिला.