धंगेकरांसह सुषमा अंधारेही अडचणीत येणार?; मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आक्रमक इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 05:35 PM2024-05-30T17:35:45+5:302024-05-30T17:36:54+5:30
शंभूराज देसाई यांनी आक्रमक भूमिका घेत मी धंगेकर आणि अंधारे यांना नोटीस बजावणार असल्याचं म्हटलं आहे.
Shambhurj Desai ( Marathi News ) : पुण्यातील कल्याणीनगर इथं झालेल्या अपघातानंतर आरोपीला वाचवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेनं केलेले गैरकृत्य चव्हाट्यावर आले. या घटनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय कलगीतुराही रंगत आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुण्यातील एक्साइज कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरलं होतं. तसंच उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. यावरून आता देसाई यांनी आक्रमक भूमिका घेत मी धंगेकर आणि अंधारे यांना नोटीस बजावणार असल्याचं म्हटलं आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आज शंभूराज देसाई म्हणाले की, "आमदार रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुण्यातील कार्यालयात जाऊन जाब विचारला. वास्तविक पुण्यातील घटनेनंतर उत्पादन शुल्क विभागाने अनेक ठिकाणी कारवाई केली आहे. परंतु धंगेकर आणि अंधारे यांनी आंदोलन करताना हातात पैसे घेून आंदोलन केले आणि माझा फोटो असलेले खोके हातात घेतले होते. याप्रकरणी मी त्यांना नोटीस बजावणार आहे. पुढील ३ दिवसांत त्यांनी आपलं वक्तव्य मागे घ्यावे, अन्यथा मी कायदेशीर कारवाईसाठी पुढाकार घेणार आहे," असा इशारा देसाईंनी दिला आहे.
उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात नेमकं काय घडलं होतं?
पुणे शहर गुन्हे शाखेने सोमवारी सकाळी ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हलनोर या दोघा डॉक्टरांना कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याप्रकरणी अटक केली. त्यानंतर आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुण्यातील उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयावर धडक दिली. त्यांच्याबरोबर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सुद्धा होत्या. धंगेकर यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना शहरात अवैधरित्या चालणारे पब आणि ड्रग्जच्या मुद्द्यावरुन चांगलेच सुनावले आहे. पोलीस प्रत्येक पबचालक, बारमालक यांच्याकडून दर महिन्याला किती हजार, लाख घेतात. चक्क याची यादीच वाचून दाखवली. तुम्ही पाप करताय, खोट बोलू नका असे म्हणत दर महिन्याला ८०, ९० लाख हप्ते घेता असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. त्यात धंगेकरांनी पोलिसांची नावेही वाचून दाखवली.
"कॉन्स्टेबल सुर्वे, पडवळ, राऊत, राहुल रामनाथ, सुप्रिटेंड चरणसिंह रजपूत हे हप्ते घेतात. पुणे महानगरपालिकेची परवानगी नसेल तर पुण्यातील पब सकाळी ४ वाजेपर्यंत कसे चालतात? आम्ही याचा जाब विचारण्यासाठी इथे आलो आहोत, आम्ही आता ही गोष्ट शांतपणे सांगायला आलो आहोत, यापुढे आम्ही तुम्हाला शांतपणे सांगणार नाही. या सगळ्या प्रकणामध्ये आम्ही पुणेकरांना नेस्तनाबुत होऊ देणार नाही. प्रत्येक ठिकाणी बारमध्ये वसुली केली जात आहे. आमच्याकडे सगळे पुरावे आहेत आणि आम्ही आता गप्प बसणार नाही. सरकारने काहीही करु द्या, आम्ही रस्त्यावर उतणार," असा इशारा रवींद्र धंगेकर यांनी दिला होता.