सुषमा अंधारे यांचा मनिषा कायंदेंवर गंभीर आरोप; अख्खं पत्रच वाचून दाखवलं, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 05:18 PM2023-06-19T17:18:35+5:302023-06-19T17:19:35+5:30

राहुल शेवाळे यांनी कायंदे यांच्यावर वाईट शब्दात टिप्पणी केली होती. त्यामुळे त्या अस्थिर झाल्या होत्या. नागपूरच्या अधिवेशनातही त्या जायला तयार नव्हत्या असा आरोपही सुषमा अंधारे यांनी केला.

Sushma Andhare's serious allegations against Manisha Kayande; After reading the entire letter, she said... | सुषमा अंधारे यांचा मनिषा कायंदेंवर गंभीर आरोप; अख्खं पत्रच वाचून दाखवलं, म्हणाल्या...

सुषमा अंधारे यांचा मनिषा कायंदेंवर गंभीर आरोप; अख्खं पत्रच वाचून दाखवलं, म्हणाल्या...

googlenewsNext

मुंबई - खासदार राहुल शेवाळे यांनी लिहिलेल्या पत्रामुळे मनिषा कायंदे घाबरल्या होत्या. हे पत्र देवेंद्र फडणवीस यांना पाठवले होते. त्यामुळे मनिषा कायंदे यांनी तिकडे प्रवेश केला. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. परंतु आमच्या नेत्यावर शिंतोडे उडवून जात असाल तर आम्ही गप्प बसणार नाही. दुसरीकडे दगड मारताना त्या काचेच्या घरात राहतात याचाही विचार त्यांनी केला पाहिजे असा इशाराच ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आमदार मनिषा कायंदे यांच्यावर हल्लाबोल केला. 

सुषमा अंधारे म्हणाल्या की, विदर्भाची जबाबदारी मनिषा कायंदे यांच्यावर होती. तिथे शिल्पा बोडखे या आमच्या कार्यकर्त्या आहेत. त्यांना जाणीवपूर्वक कायंदे त्रास देत राहिल्या. कारण शिल्पा बोडखे यांनी आम्हाला सांगितले होते की मनिषा कायंदे यांनी शिंदे गटाचा निरोप घेऊन अनेक महिला पदाधिकाऱ्यांशी बोलत आहेत. आपण तिकडे गेले पाहिजे असं त्या म्हणत होत्या. हे सर्व पूर्वनियोजित होते. काही माणसे फोडण्यासाठी त्यांना थांबवले गेले. त्याचा मुहुर्त जाणीवपूर्वक वर्धापन दिनी हादरा वैगेरे अशा बातम्या करण्यासाठी होता असं त्यांनी म्हटलं. 

तसेच हा कसोटीचा काळ असून या काळात निष्ठा सिद्ध करण्याची संधी असते. ज्या लोकांना पक्षाने प्रचंड दिले, मोठं बनवले त्यांच्याकडून अशा अपेक्षा नसतात. कायंदे यांचा शिंदे गटात पक्षप्रवेश हा माझ्यासाठीही शॉकिंग न्यूज होती. ४-५ महिन्यांपासून त्या शिंदे गटाच्या संपर्कात होत्या. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमालाही त्या उपस्थित होत्या. मला व्यवस्था बघावी लागेल अशी त्यांची धाटणी होती. शीतल म्हात्रे या प्रकरणात मनिषा कायंदे या महिलांवर आघात वैगेरे बोलत होत्या. परंतु माझ्यावर जे आरोप झाले तेव्हा त्या काहीच बोलल्या नाहीत असा आरोपही अंधारेंनी केला. 

राहुल शेवाळेच्या पत्रानं मनिषा कायंदे घाबरल्या, काय होतं पत्रात?
सुषमा अंधारे यांनी म्हटलं की, राहुल शेवाळे यांच्यावर एका महिलेने आरोप केले ही महिला सर्वात पहिले मनिषा कायंदे यांच्या संपर्कात होती. मनिषा कायंदे यांनी हा प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता. त्यानंतर राहुल शेवाळे यांनी कायंदे यांच्यावर वाईट शब्दात टिप्पणी केली होती. त्यामुळे त्या अस्थिर झाल्या होत्या. नागपूरच्या अधिवेशनातही त्या जायला तयार नव्हत्या. तुम्ही खऱ्या आहात मग घाबरता कशाला असं पक्षाने त्यांना म्हटलं. पण तरीही त्या घाबरत होत्या. एक दिवस अधिवेशनात जाऊन तातडीने माघारी आल्या. राहुल शेवाळे यांनी एक पत्र देवेंद्र फडणवीस यांना लिहिले होते. त्या पत्रामुळे मनिषा कायंदे प्रचंड हैराण झाल्या होत्या. त्यामुळेच त्या तिकडे गेल्या. हे पत्र मधू चव्हाण यांच्याबाबतीत होते. ज्यात मनिषा कायंदे यांनी कशारितीने आर्थिक फायदा करून घेतला त्याची चौकशी करण्याचे हे पत्र होते असा आरोप त्यांनी केला.  

सुषमा अंधारे यांनी हे पत्र वाचून दाखवले, त्यात लिहिलं होतं की, मनिषा कायंदे यांच्याकडून होणाऱ्या ब्लॅकमेलिंग आणि धमकीची चौकशी होण्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले होते. त्यात असं लिहिले होते की, २००७-०८ काळात ज्येष्ठ नेते यांचे मा. आमदारांसोबत लग्न, मढ आयलँड बोरिवली येथील बंगल्यात ज्येष्ठ नेते माजी मंत्र्यांच्या निवडक उपस्थित झाले. सदर नेत्याविरोधात लैंगिक शोषणाच्या तक्रारी केल्या. सायन विधानसभा निवडणुकीत उभे राहण्यासाठी संबंधित नेत्याला ५० लाखांची मागणी केली. ती मागणी न झाल्याने पुढे तक्रारी, ब्लॅकमेलिंग करण्यात आले. दरम्यानच्या काळात नेत्याला कळाले की, त्यांचे पीए आणि महिला आमदार यांच्यात रात्री २ पर्यंत दारू पिऊन रंग उधळणे सुरू होते. त्याचप्रमाणे वेलू नामक धारावीस्थित व्यक्तीसोबत दारू पिणे सुरू होते.

सदर नेत्याच्या लालबाग येथील १ बीएचके प्लॅटमध्ये टाळे तोडून ताबा घेतला, त्या सोसायटीने रितसर कारवाई करून त्यांना बाहेर काढले. गाडी, ड्रायव्हर आणि घरखर्च तोच नेता करत होता. परदेश दौरा, सोने या नेत्यांकडून कायंदे यांनी घेतले. एमडी कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून त्याच नेत्याने लावले. त्यासाठी एमडी कॉलेजला १ कोटी सरकारी निधी दिला. पीएचडी हातीपर्यंत सर्व खर्च नेत्यानेच केला. कुप्रसिद्ध गँगस्टर डि के राव यांच्याकडून सदर नेत्याला धमकी देणे, दबाव आणणे हे उद्योग केले. सदर नेत्याच्या मुलीने कॉलेज आवारात मनिषा कायंदे यांना जाहीर मारहाण केली. त्या नेत्याचे दादरचे राहते घर, वडिलांचे दवाखाना, दुकाने लाखोंचा खर्च करून फर्निश करून घेतले, स्थावर मालमत्ता जमा केली. सदर प्रकरणात भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. सदर माहितीच्या आधारे तातडीने या विषयाशी चौकशी करावी अशी मागणी होती. 

दरम्यान, मविआ पटली नाही मग १ वर्ष का थांबला? शिंदेंवर पक्ष चोरीचा, चिन्ह चोरीचा आरोप केला मग आता का हे आठवत नाही. खासगी विषयांची चौकशी होऊ नये या भीतीपोटी मनिषा कायंदे तिकडे जातात. जाताना उद्धव ठाकरे यांच्यावर शिंतोडे उडवत असतील तर आम्ही गप्प का बसू? त्यांना प्रगती कशी करायची हा त्यांचा प्रश्न आहे. पैसा कमावणे, आमदारकी मिळवणे ही प्रगती त्यांनी करावी असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलं. 

Web Title: Sushma Andhare's serious allegations against Manisha Kayande; After reading the entire letter, she said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.