तूर, उडदाच्या साठेबाजीचा संशय; मुंबई, अकोला, लातूर, सोलापूर रडारवर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 08:44 AM2023-04-18T08:44:23+5:302023-04-18T08:44:38+5:30
Mumbai: तूर आणि उडद या डाळींची संभाव्य साठेबाजी रोखण्यासाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने पावले उचलली असून, राज्यातील मुंबई, अकोला, लातूर आणि सोलापूर हे चार जिल्हे रडारवर आहेत.
नवी दिल्ली : तूर आणि उडद या डाळींची संभाव्य साठेबाजी रोखण्यासाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने पावले उचलली असून, राज्यातील मुंबई, अकोला, लातूर आणि सोलापूर हे चार जिल्हे रडारवर आहेत.
डाळ व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या साठ्यांची नियमित आणि प्रामाणिकपणे माहिती न दिल्यास अघोषित साठे जप्त करून कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा ग्राहक संरक्षण मंत्रालयाने दिला आहे. तूर आणि उडद डाळींच्या साठ्यांचा साप्ताहिक आढावा घेण्यासाठी ग्राहक संरक्षण विभागाच्या अतिरिक्त सचिव निधी खरे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे.
महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि तामिळनाडू या चार राज्यांतील १० शहरांमध्ये तूर आणि उडदडाळीच्या साठ्यांचे वास्तव जाणून घेण्यासाठी गेल्या आठवड्यात ग्राहक संरक्षण विभागाने आपल्या १२ वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवले होते.
व्यापारी, आयातदारांनी माहिती लपवली
महाराष्ट्रातील मुंबई, अकोला, लातूर, सोलापूरसह इंदूर, सालेम, चेन्नई, कलबुर्गी, जबलपूर आणि कटनी येथे अधिकाऱ्यांनी राज्य सरकारचे अधिकारी, डाळ मिलचे मालक, व्यापारी, आयातदार आणि बंदरांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. डाळींचे व्यापारी आणि आयातदार माहिती लपवत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.
चेन्नई बंदरातून तूरडाळीची आयात
डाळींच्या बाजारपेठांना भेटी देऊन व्यापाऱ्यांशी चर्चा करणाऱ्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांसोबत ग्राहक संरक्षण खात्याचे सचिव रोहितकुमार सिंह यांची बैठक झाली. तेलंगण, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकचे व्यापारी चेन्नई बंदराच्या माध्यमातून तूरडाळीची आयात करीत असल्याची माहिती त्यांना देण्यात आली.
डाळ महागली
वर्षभरात तूरडाळीच्या दरात १५ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर मोठा भार पडत आहे. महाराष्ट्रात गेल्या वर्षी एप्रिलमध्ये प्रति क्विंटल ९ हजार १२५ रुपये दर होता. तोच या वर्षी एप्रिलमध्ये १० हजार ५०० रुपये झाला आहे. सर्वाधिक भाववाढ बिहारमध्ये झाली आहे. तेथे वर्षभरात ८८ टक्के भाव वाढले आहेत. मध्य प्रदेशात ३५ टक्के भाववाढ तर कर्नाटकात २३ टक्के भाववाढ झाली.