दरोड्यातील संशयित ठाण्यातून ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2017 06:27 AM2017-01-18T06:27:15+5:302017-01-18T06:27:15+5:30
मुथूट फायनान्सच्या हैदराबादजवळच्या शाखेत दरोडा टाकून तब्बल ४० किलो सोने लुटणाऱ्या टोळीतील एका संशयितास ठाणे पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले.
राजू ओढे,
ठाणे- मुथूट फायनान्सच्या हैदराबादजवळच्या शाखेत दरोडा टाकून तब्बल ४० किलो सोने लुटणाऱ्या टोळीतील एका संशयितास ठाणे पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले. त्याला तेलंगणा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
२८ डिसेंबर २०१६ रोजी पडलेल्या या दरोड्यातील आरोपी मुंबईचे असल्याची प्राथमिक माहिती तेलंगणा पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे ते मुंबई पोलिसांच्या संपर्कात होते. या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रवी नामक एका संशयितास ताब्यात घेतले. तो सहा सराईत गुन्हेगारांच्या संपर्कात होता. मंगळवारी तेलंगणा पोलिसांच्या पथकाने ठाण्यात येऊन रवीला ताब्यात घेतले आहे.
>तुरुंगात शिजला कट
या दरोड्यातील पाचही आरोपींची भेट तुरुंगात झाली होती. तेथेच या दरोड्याचा कट शिजला. गुन्ह्यात वापरलेल्या स्कॉर्पिओ गाडीवर कधी कर्नाटक, कधी आंध्रप्रदेश, तर कधी महाराष्ट्राचा नंबर टाकला जायचा. आरोपींच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे ते मुंबईचे असावे, असा संशय तेलंगणा पोलिसांना होता. त्यामुळे ते मुंबई पोलिसांच्या संपर्कात होते.