प्रशासन अधिकाऱ्याला निलंबित करा!
By admin | Published: March 4, 2017 01:52 AM2017-03-04T01:52:49+5:302017-03-04T01:52:49+5:30
कांबळे यांच्याविरोधात मंडळातील महिला कर्मचाऱ्यास अश्लील चित्रफीत पाठवल्याबाबत शिवाजी पार्क पोलिसांत गुन्हा दाखल
मुंबई : कामगार कल्याण मंडळातील प्रशासन अधिकारी संजय कांबळे यांच्या निलंबनासाठी वाघिणी संघटनेने मुख्यमंत्री व कामगारमंत्र्यांना आंदोलनाचा इशारा दिला आहे. कांबळे यांच्याविरोधात मंडळातील महिला कर्मचाऱ्यास अश्लील चित्रफीत पाठवल्याबाबत शिवाजी पार्क पोलिसांत गुन्हा दाखल आहे. त्यामुळे कांबळे यांचे निलंबन करण्याची संघटनेची मागणी आहे.
यासंदर्भात संघटनेच्या अध्यक्षा ज्योती बडेकर यांनी सांगितले की, कांबळे यांच्यावर महिला कर्मचाऱ्याला अश्लील चित्रफीत पाठवल्याचा गंभीर गुन्हा ३ फेब्रुवारीला दाखल करण्यात आला आहे. मुळात या गंभीर गुन्ह्यासाठी ५ वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. तरी कांबळे यांच्याविरोधात प्रशासनाने शिस्तभंगाची निलंबनाची कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली आहे. मात्र कारवाई करण्याऐवजी शासनाकडून या प्रकरणी टाळाटाळ सुरू असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री, कामगार मंत्री आणि कामगार सचिवांना संघटनेने ८ मार्च या महिला दिनापर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. महिन्याभरात ढिम्म बसलेल्या शासनाने ४ दिवसांत कारवाई केली नाही, तर ८ मार्चपासून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
याआधी तक्रारदार महिला कर्मचाऱ्याने कल्याण आयुक्तांकडे या प्रकरणी तक्रार नोंदवलेली आहे. मात्र मंडळाने द्वितीय श्रेणीतील या अधिकाऱ्याच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीत त्यांचेच कनिष्ठ मात्र द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील महिला सदस्यांचा समावेश आहे. या हास्यास्पद प्रकाराला तक्रारदार महिलेने कडाडून विरोधही दर्शवला. मुळात वरिष्ठ अधिकाऱ्याची चौकशी कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून करताना कितपत निष्पक्षपातीपणा असेल, यावर तक्रारदार महिलेने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. (प्रतिनिधी)
>कल्याण आयुक्तांना निवेदन सादर
तूर्तास तरी या प्रकरणी फौजदारी खटला दाखल झालेला असून, न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यामुळे निष्पक्षपातीपणे निकाल लागण्यासाठी कांबळे यांचे निलंबन करण्याची मागणी तक्रारदार महिलेने कल्याण आयुक्तांना केली आहे.