अकार्यक्षम परिवहन व्यवस्थापकांना निलंबित करा
By Admin | Published: July 18, 2016 03:16 AM2016-07-18T03:16:38+5:302016-07-18T03:16:38+5:30
केडीएमटीच्या बससेवेबाबत नागरिकांमध्ये दिवसेंदिवस असंतोष निर्माण होत आहे.
कल्याण : केडीएमटीच्या बससेवेबाबत नागरिकांमध्ये दिवसेंदिवस असंतोष निर्माण होत आहे. केडीएमटी उपक्रमाच्या दुरवस्थेला परिवहन व्यवस्थापक देविदास टेकाळे हेच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवा, अशी मागणी महापालिकेतील मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनी आयुक्त ई. रवींद्रन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
‘केडीएमटी’ची दुरवस्था व आर्थिक डबघाईचे चित्र ‘लोकमत’ने ११ जुलैला ‘आॅन दी स्पॉट’द्वारे मांडले होते. महापालिकेतील विरोधीपक्षनेते प्रकाश भोईर यांनी त्याची दखल घेत याप्रकरणी त्यांनी रवींद्रन यांच्याशी पत्रव्यवहार करून अकार्यक्षम परिवहन सेवेत सुधारणा करण्याची विनंती केली होती. त्यानंतर, हळबे यांनीही रवींद्रन यांना निवेदन सादर करून केडीएमटीतील अधिकाऱ्यांचा बेशिस्तपणा, नाकर्तेपणा व परिवहन व्यवस्थापक आणि प्रशासनावर सत्ताधारी पक्षाचा नसलेला अंकुश याकडे लक्ष वेधले आहे.
केडीएमटी उपक्रम सुस्थितीत चालू शकतो, याबाबत उपक्रमातील अधिकाऱ्यांसमवेत अनेकदा अभ्यासपूर्ण, मुद्देसूद पत्रव्यवहार करण्यात आला आहे. यामध्ये रेल्वे स्थानके , महाविद्यालये, तीर्थक्षेत्रे, प्रेक्षणीय स्थळे तसेच महापालिका क्षेत्राच्या आजूबाजूच्या परिसरातील टिटवाळा, पडघा, भिवंडी, मुरबाड, सरळगाव, नवी मुंबई, ठाणे ही शहरे व या शहरांना जोडणारी रस्त्यालगतची व आसपासची गावे यांचा सखोल अभ्यास करून या भागात नियोजित वेळेत परिवहन सेवेच्या बस उपलब्ध करून दिल्यास आपली परिवहन सेवा कधीच तोट्यात चालणार नाही, अशा आशयाचा पत्रव्यवहार करूनही याची साधी दखलही घेतलेली नाही, असे हळबे यांचे म्हणणे आहे.
केडीएमटी चांगली सेवा देत नसल्याने चालक आणि वाहक हे नेहमीच नागरिकांच्या रोषास बळी पडत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. उपक्रमातील अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे कर्मचाऱ्यांना वेतन देण्यास नेहमीच दिरंगाई होत आहे. एकंदरीच या वातावरणाचा कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. परिवहन व्यवस्थापकांना स्वत: परिवहन सेवेत नियोजनबद्ध पद्धतीने सुधारणा करण्यात कोणताही रस नसल्याने परिवहन उपक्रमाला लागलेले दुरवस्थेचे ग्रहण ‘जैसे थे’ असल्याकडे हळबे यांनी लक्ष वेधले आहे.
१७ वर्षांत आपले बस मार्ग, बस क्रमांक व थांबे निश्चित करता आलेले नाहीत. जे काही मोजके थांबे आहेत, तेथे बेकायदा फेरीवाले आणि रिक्षाचालकांचे अतिक्रमण पाहावयास मिळते. परिवहन सेवेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना ऊन-वारा-पाऊस यापासून संरक्षण देणारे बसथांबे नाहीत. खंबाळपाडा येथील बस आगारातील कचऱ्याच्या गाड्या आणि अस्वच्छता पाहता या आगाराला एकप्रकारे डम्पिंगचे स्वरूप प्राप्त झाल्याचेही हळबे यांनी निवेदनात म्हटले आहे.
उत्पन्न आणि खर्चात प्रचंड तफावत असताना बसथांब्यांची झालेली दुरवस्था, रिक्षातळांचे अतिक्रमण, उपक्रमातील घोटाळे, कार्यालयांची दुरवस्था, आगारात विजेअभावी अंधाराचे साम्राज्य या बाबींचा उल्लेख ‘लोकमत’च्या ‘आॅन दी स्पॉट’मध्ये करण्यात आल्यानंतर केडीएमटीचे सभापती भाऊसाहेब चौधरी आणि आयुक्तई. रवींद्रन हे शुक्रवारी संयुक्त दौरा करून दुरवस्थेचा आढावा घेणार होते. त्यात वसंत व्हॅली, गणेशघाट आणि खंबाळपाडा आगारासह डोंबिवली पूर्वेकडील बाजीप्रभू चौकातील नियंत्रण कक्ष आणि डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक परिसराची पाहणी केली जाणार होती.
परंतु, आयुक्तांना ऐनवेळी मंत्रालयात एका बैठकीसाठी जावे लागल्याने आयुक्तांविना सभापती आणि सदस्यांना दौरा करावा लागला. यावेळी त्यांच्यासमवेत परिवहन व्यवस्थापक देविदास टेकाळे उपस्थित होते.
यावेळी दुरवस्थेच्या पार्श्वभूमीवर योग्य ती तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना व्यवस्थापकांना सभापतींनी केल्या.