आमदार परिचारकांना निलंबित करा!
By admin | Published: March 7, 2017 06:11 AM2017-03-07T06:11:47+5:302017-03-07T06:12:17+5:30
परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नीबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे तीव्र पडसाद सोमवारी विधान परिषदेत उमटले.
मुंबई : जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपा पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नीबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे तीव्र पडसाद सोमवारी विधान परिषदेत उमटले. परिचारक यांचे वक्तव्य अत्यंत घृणास्पद आणि सभागृहाच्या परंपरेला काळिमा फासणारे असून, त्यांना तातडीने निलंबित करावे, अशी जोरदार मागणी भाजपा वगळता सर्वच पक्षांच्या सदस्यांनी केली.
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आ. परिचारकांच्या वक्तव्याचा मुद्दा उपस्थित केला. विधान परिषदेच्या एखाद्या सदस्याने असे वक्तव्य करणे ही सर्वच सदस्यांसाठी लाजिरवाणी बाब आहे. परिचारक यांनी हे वक्तव्य सभागृहाबाहेर केले असले तरी त्यांच्या त्या वक्तव्यामुळे सभागृहाला कमीपणा आला आहे. त्यामुळे परिचारकांचे सदस्यत्वच तत्काळ रद्द करण्यात यावे. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिचारक यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडावा, अशी मागणी मुंडे यांनी केली. जोपर्यंत त्यांचे निलंबन होत नाही तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
मुंडे यांनी परिचारक यांच्या निलंबनाची मागणी करताच भाजपा वगळता सर्वच पक्षाच्या सदस्यांनी त्याला पाठिंबा
दिला. काँग्रेसचे भाई जगताप, शरद रणपिसे, शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादीचे हेमंत टकले, विद्या चव्हाण आणि जयदेव गायकवाड तर लोकभारतीचे कपिल पाटील यांनीही परिचारक यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या निलंबनाची मागणी केली.
निवडणूकीच्या काळात सर्वच नेते एकमेकांवर टिका टिप्पणी करत असतात. पण राजकारणासाठी सैन्यदलाच्या कुटुंबियांचा अपमान करणे दुर्दैवी आहे. वरिष्ठ सभागृहाच्या सदस्याकडे समाजात वेगळ्या नजरेने पाहिले जाते. अशावेळी या सभागृहाच्य सदस्याने असे अवमानकारक वक्तव्य काढले असेल तर त्याचा फक्त निषेध करुन चालणार नाही तर त्यांचे तात्काळ निलंबन करण्यासाठी जे काही करावे लागेल ते सर्व करावे, अशी भावना सदस्यांनी व्यक्त केल्या. आ. परिचारक यांच्या या विधानामुळे आमदार म्हणून आमची मान शरमेने खाली गेली आहे. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी असे वक्तव्य करणा-याला फासावर लटकवले असते, असे निलम गो-हे म्हणाल्या.
यावेळी भाजपाच्या एकाही सदस्याने भाष्य केले नाही. मात्र, सभागृह नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या दालनात सर्वपक्षिय गटनेत्यांच्या बैठक बोलावण्यात यावी. या बैठकीत जो निर्णय घेतला जाईल, तो सरकारला मान्य असेल असे सांगितले. (प्रतिनिधी)