अयोग्य प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी ३७ वाहन निरीक्षक निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 09:27 PM2018-09-21T21:27:54+5:302018-09-21T21:45:43+5:30
राज्यातील सहा प्रादेशिक परिवहन कार्यालयातील २८ मोटार वाहन निरीक्षक व ९ सहायक मोटार वाहन निरीक्षक अशा एकुण ३७ जणांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
पुणे : वाहनांची काटेकोर तपासणी न करता योग्यता प्रमाणपत्रे दिल्याप्रकरणी राज्यातील सहा प्रादेशिक परिवहन कार्यालयातील २८ मोटार वाहन निरीक्षक व ९ सहायक मोटार वाहन निरीक्षक अशा एकुण ३७ जणांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. त्यामध्ये पुणे कार्यालयातील सर्वाधिक निरीक्षक आहेत. त्यामुळे परिवहन विभागात एकच खळबळ उडाली आहे.
प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांकडून वाहनांची ठराविक कालावधीमध्ये तपासणी करून त्यांना योग्यता प्रमाणपत्र दिले जाते. पण परिवहन विभागाने काही महिन्यांपुर्वी केलेल्या तपासणीमध्ये यवतमाळ, कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद, पनवेल व ठाणे कार्यालयांमध्ये याबाबतीत निष्काळजीपणा झाल्याचे आढळून आले आहे. त्यामध्ये विभागाने संबंधित २८ मोटार वाहन निरीक्षक व ९ सहायक मोटर वाहन निरीक्षकांना दोषी धरत शासकीय सेवेतून निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सध्या पुण्यातील आरटीओमध्ये कार्यरत असलेले नऊ निरीक्षक व चार सहायक निरीक्षकांचा समावेश आहे. तर दोन निरीक्षक पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील आहेत. हे दोघे जण तपासणीवेळी पुणे कार्यालयात कार्यरत होते. त्याचप्रमाणे तपासणीवेळी पुणे कार्यालयात कार्यरत असलेले व सध्या इतर कार्यालयात असलेल्या तीन निरीक्षकांना निलंबित करण्यात आले आहे.
पुण्यासह औरंगाबाद कार्यालयातील ४, यवतमाळमधील १, सातारा १, रत्नागिरी १, कोल्हापूर १, पेण १, कल्याण १, ठाणे ३, सांगली १, कराड १, अमरावती १ निरीक्षक आणि पनवेल कार्यालयातील २, ठाणे १ व कराड कार्यालयातील एका सहायक निरीक्षकाचा यामध्ये समावेश आहे.
----------------------
पुणे व पिंपरी चिंचवड कार्यालयातील निलंबित अधिकाऱ्यांची नावे -
मोटार वाहन निरीक्षक
अधिकारी घटनेवेळी कार्यरत कार्यालय सध्या कार्यरत कार्यालय
सुनिल क्षीरसागर पुणे पिंपरी चिंचवड
मयुर भोसेकर पुणे पिंपरी चिंचवड
ए. व्ही. गवारे पुणे पुणे
विजयसिंह भोसले पुणे पुणे
समीर सय्यद पुणे पुणे
प्रदीप बराटे पुणे पुणे
रंगनाथ बंडगर पुणे पुणे
राजेंद्र केसकर पुणे पुणे
जकीउद्दीन पाशमिया बिरादार पुणे सातारा
अरविंद फुलारी पुणे रत्नागिरी
संदीप म्हेत्रे पुणे पुणे
विजय सावंत पनवेल पुणे
संभाजीराव होलमुखे पनवेल पुणे
अश्विनी जाधव पुणे अमरावती
---------------
सहायक मोटार वाहन निरीक्षक - नितीन पारखे, त्रिवेणी गालिंदे, सावन पाटील व ज्योतीलाल शेटे (चौघेही घटनेवेळी व सध्याही पुणे कार्यालयात कार्यरत आहेत.)