महिलेवरील सामूहिक बलात्कार प्रकरणी ४ RPF जवान निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2016 11:07 AM2016-09-09T11:07:49+5:302016-09-09T11:29:23+5:30
दिवा येथे एका २५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याच्या आरोपावरून आरपीएफच्या ४ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. ९ - गेल्या जानेवारीमध्ये दिवा येथे एका २५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याच्या आरोपावरून आरपीएफच्या ४ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. आरोपी पोलिसांच्या भीतीमुळे पीडित महिला अत्याचारानंतर इतका काळ गप्प राहिली, मात्र आरोपींपैकी एकाने तिच्याशी पुन्हा संपर्क साधत तिला ब्लॅकमेल करत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. त्यानंतर मात्र पीडित महिलेने बुधवारी आरपीएफच्या वरिष्ठ अधिका-यांशी संपर्क साधत तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहित देत तक्रार दाखल केली. वरिष्ठांनीही या घटनेची गंभीर दखल घेत त्या चौघांना निलंबित केले आहे. हेड कॉन्स्टेबल पी. के. सिंग (५७) व बी.के. सिंग (५८), कॉनस्टेबल दीपक राठोड आणि बाघेल सिंग अशी चौघांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर महिला मूळची उत्तर प्रदेशमधील आरोपींपैकी एक असलेले पी.के. सिंग हे ही तिच्याच गावचे असून ती त्यांना काका मानत असे. नव-याशी झालेल्या भांडणानंतर पीडित महिलेने स्व:च्या उदरनिर्वाहासाठी मुंबई गाठले. तेव्हा पी. के. सिंग यांनी तिला काम मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यासंदर्भातच जानेवारी महिन्यात त्यांनी तिला दुपारच्या सुमारास फोन करून दिवा स्टेशन येथील आरपीएफ कार्याललाय बोलावले. ती तेथे पोहोचली असता पी. के. सिंग व त्यांचे सहकारी दारू पीत अश्लील फिल्म पाहत होते. त्यांनी पीडित महिलेला शीतपेयातूम गुंगीचे औषध दिले व तिची शुद्ध हरपल्यानंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. या घटनेची कोठेही वाच्यता केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकीही त्यांनी दिली.
या घटनेला अनेक महिने उलटून गेल्यानंतरही पोलिसांच्या भीतीने ती महिला गप्प राहिली. मात्र काही काळानंतर आरोपींपैकी एकाने तिला ब्लॅकमेल करून शरीरसुखाची मागणी केल्यावर मात्र त्याचा महिलेचा संयमाचा बांध फुटला आणि तिने तत्काळ पोलिसांकडे धाव घेत अत्याचाराची तक्रार दाखल केली.
यापूर्वी रेल्वेल पोलिसांनी केलेल्या अत्याचाराचा घटना समोर आल्या असून गेल्या वर्षी दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान एका फेरीवाल्या महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप एका जीआरपी कॉन्स्टेबल वर लावण्यात आला होता.