उर्मट आणि बेजबाबदार वैद्यकीय अधिकारी निलंबित; अर्भकाच्या मृत्यूचा ठपका
By admin | Published: June 30, 2017 10:13 PM2017-06-30T22:13:09+5:302017-06-30T22:13:09+5:30
अर्भकाचा गर्भातच मृत्यू झाल्याची गंभीर दखल घेत आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी उर्मट आणि बेजबाबदार वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणिल पढ्यार याला आज निलंबित केले
राजू काळे/ऑनलाइन लोकमत
भाईंदर, दि. 30 - मीरा रोड येथील पालिकेच्या भारतरत्न स्व. इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये कर्तव्यात कसूर केल्याने निष्पाप अर्भकाचा गर्भातच मृत्यू झाल्याची गंभीर दखल घेत आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी उर्मट आणि बेजबाबदार वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणिल पढ्यार याला आज निलंबित केले.
गांधी रुग्णालयात 12 मे रोजी एक गरोदर महिला पोटात दुखत असल्याची तक्रार घेऊन रुग्णालयात आली. त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या डॉ. प्रणिलने त्या महिलेची संपूर्ण तपासणी न करता तिला फक्त पोटदुखीचे बसकोपॅन इंजेक्शन देऊन घरी पाठविले. त्यानंतर देखील ती महिला आणखी दोन वेळेस रूग्णालयात आली आणि तिने गर्भामधील बाळाची हालचाल कमी झाल्याचे डॉ. प्राणिल यांना सांगितले.
त्यावेळीसुद्धा डॉ. प्रणिलने तिची संपूर्ण तपासणी केली नाही. शेवटी योग्य उपचाराअभावी त्या महिलेच्या पोटातील अर्भकाचा गर्भामध्येच मृत्यू झाला. याची माहिती आयुक्तांना अगोदरच मिळाली होती. तसेच तत्कालीन महासभेने देखील डॉ. प्रणिल याच्या बेजबाबदार आणि निष्काळजीपणाच्या वर्तणुकीची चौकशी करण्याचे निर्देश आयुक्तांना दिले होते. त्याची गंभीर दखल घेत आयुक्तांनी प्रणिलला आज निलंबित केले असून, त्याची विभागीय चौकशी करून एक आठवड्याच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले आहेत. डॉ. प्रणिलविरोधात वरिष्ठांशी उर्मटपणे बोलणे, सहकारी वैद्यकीय अधिकारी यांना सलोख्याची वागणूक न देणे, ड्युटी करणेस नकार देणे, गंभीर रूग्णांकडे निष्ठूरतेने बघणे, रुग्णाला तपासण्याकरिता परिचारिकेने बोलाविले असता वेळेवर न पोहोचणे, फोन न उचलणे, फोनवरून उर्मटपणे बोलणे, फोन कट करणे, बदली वैद्यकीय अधिकारी येईपर्यंत वाट न बघता रुग्णालय सोडून जाणे, पूर्वपरवानगी शिवाय गैरहजर राहणे अशा तक्रारी विभागप्रमुखांना अनेकदा प्राप्त झाल्या होत्या. तसेच 18 ऑक्टोबर 2016 रोजी एका संशयास्पद आजारी अज्ञात मुलाला त्याचा केसपेपर न बनविताच रुग्णालयामध्ये दाखल करून घेतले होते. त्याची माहिती देखील त्याने पोलिसांना दिली नाही.
प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव यांनी याबाबत चौकशी केली असता मी बाहेरगावी आहे, असे सांगून त्याने फोन बंद केला. अशा गंभीर तक्रारींनंतर 12 मेच्या भावनाशून्य व निर्दयी घटनेची गंभीर दखल घेण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले. अशा प्रकारचे वर्तन यापुढे सहन करून घेतले जाणार नाही, अशी सक्त ताकीद सुद्धा त्यांनी इतरांना दिला आहे.