विश्रामगृहात झोपून अर्ज घेणारा हवालदार निलंबित
By admin | Published: March 6, 2017 11:17 PM2017-03-06T23:17:23+5:302017-03-06T23:17:23+5:30
तक्रार दाखल करण्यास आलेल्या महिलेला अपमानास्पद वागणूक देऊन तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी दहिवडी पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार चंद्रहार राक्षे याचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील
आॅनलाईन लोकमत
दहिवडी (सातारा), दि. 6 : तक्रार दाखल करण्यास आलेल्या महिलेला अपमानास्पद वागणूक देऊन तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी दहिवडी पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार चंद्रहार राक्षे याचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी निलंबन केले आहे.
याबाबत माहिती अशी की, दहिवडी पोलिस ठाण्यात एक महिला तक्रार देण्यासाठी गेली होती. त्यावेळी पोलिस हवालदार चंद्रहार राक्षे त्या ठिकाणी हजर नव्हता. तसेच त्याने तक्रार घेण्यासाठी पोलिस ठाण्यात येण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे संबंधित महिला पोलिस ठाणे परिसरातीलच विश्रामगृहामध्ये विश्रांती घेत असलेल्या राक्षे याच्याकडे तक्रार देण्यासाठी गेली. त्या ठिकाणी हवालदार राक्षे झोपलेला होता. त्याने तक्रार झोपेतून उठून घेण्याऐवजी झोपूनच तक्रार अर्ज वाचला व तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली. त्या महिलेस अपमानास्पद वागणूक देऊन हुसकावून लावून पुन्हा झोपी गेला.
संबंधित महिलेने याबाबत नातेवाइकांसोबत पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांची भेट घेऊन चित्रफितीसह हकिकत सांगितली. त्यामुळे संदीप पाटील यांनी पोलिस हवालदार राक्षे याचे निलंबन करून पोलिस निरीक्षक, सातारा शहर पोलिस ठाणे यांना खातेनिहाय चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.