कोपर्डी खटल्याची दुसऱ्या दिवशीही सुनावणी स्थगित
By admin | Published: March 11, 2017 12:52 AM2017-03-11T00:52:14+5:302017-03-11T00:52:14+5:30
आरोपीचे वकील न्यायालयात हजर नसल्याने कोपर्डी अत्याचार व खून खटल्याची सलग दुसऱ्या दिवशीही शुक्रवारी सुनावणी स्थगित करावी लागली़ पुढील सुनावणीच्या वेळी
अहमदनगर : आरोपीचे वकील न्यायालयात हजर नसल्याने कोपर्डी अत्याचार व खून खटल्याची सलग दुसऱ्या दिवशीही शुक्रवारी सुनावणी स्थगित करावी लागली़ पुढील सुनावणीच्या वेळी वकिलांना न्यायालयात हजर ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत़
जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर कोपर्डी खटल्याची सुनावणी सुरू आहे़ गुरुवारी या खटल्यातील आरोपी क्रमांक दोन संतोष भवाळ याचे वकील बाळासाहेब खोपडे यांचा अनुपस्थित राहण्याचा अर्ज ऐनवेळी न्यायालयात सादर करण्यात आला होता़ शुक्रवारी सुनावणीच्या वेळी आरोपीने वकिलाची पर्यायी व्यवस्था करावी, असे न्यायालयाने सूचित केले होते़ शुक्रवारी दुपारी १२ वाजता सुनावणी सुरू झाली तेव्हा खोपडे हे आजारी असल्याने येऊ शकणार नाहीत, असे न्यायालयात कळविण्यात आले़ त्यावर सरकारी पक्षाच्या वतीने अॅड ़ उज्ज्वल निकम यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
कोपर्डी खटला हा महत्त्वाचा असून, अंतिम टप्प्यात आहे़ अशा वेळी आरोपीच्या वकिलांनी गैरहजर राहण्याविषयी आधी कळविणे गरजेचे आहे़ ते याआधीही गैरहजर राहिले होते़ न्यायालयाने त्यांना समज द्यावी, असे त्यांनी नमूद केले़ शुक्रवारी कर्जतचे तहसीलदार, ठाणे अंमलदार यांच्यासह आणखी दोन अशा एकूण चार साक्षीदारांच्या साक्ष होणार होत्या़ सुनावणी न झाल्याने त्यांना परत जावे लागले़ खटल्याची पुढील सुनावणी आता १७, १८, १९ व २० मार्च दरम्यान होणार आहे़ (प्रतिनिधी)
सरकारी पक्ष तपासणार नवीन साक्षीदार
कोपर्डी खटल्यात एक नवीन साक्षीदार तपासण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शुक्रवारी अॅड़ निकम यांनी न्यायालयाकडे केली आहे़ या खटल्यात आधी तपासण्यात आलेल्या दत्तात्रय सुद्रिक या साक्षीदाराला कोपर्डी घटनेबाबत पुणे येथे नवनाथ पाखरे या व्यक्तीने माहिती दिली होती़ त्याच्या माहितीवरूनच सुद्रिक याला अत्याचाराची घटना कळाली होती़ त्यामुळे पाखरे या साक्षीदाराचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे़ हा नवीन साक्षीदार असून, पोलिसांनी जबाब घेतलेला नाही़