‘त्या’ 22 मृतदेहांच्या विटंबनेप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांना निलंबित करा, राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 09:47 PM2017-09-29T21:47:40+5:302017-09-29T23:40:39+5:30
एलफिन्स्टन रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीतील मृत्युमुखी प्रवाशांच्या कपाळावर पोलिसांनी अनुक्रमांक नोंदवणे ही अक्षम्य विटंबना असून, त्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांना तातडीने निलंबित करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
मुंबई- एलफिन्स्टन रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीतील मृत्युमुखी प्रवाशांच्या कपाळावर पोलिसांनी अनुक्रमांक नोंदवणे ही अक्षम्य विटंबना असून, त्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांना तातडीने निलंबित करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर विखे पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
ते म्हणाले की, मुंबई पोलिसांनी केलेला हा प्रकार मानवतेची क्रूर थट्टा आणि असंवेदनशीलतेची परिसीमा आहे. जिवंत अन् मेलेल्या माणसांनाही जनावरासारखी वागणूक देणाऱ्या गेंड्याच्या कातडीच्या सरकारचा आणि प्रशासनाचा करावा तेवढा निषेध कमीच ठरेल. या प्रकरणाची नैतिक जबाबदारी म्हणून मुंबई पोलीस आयुक्त व संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.
#Elphinstone#Stampede मधील 22 प्रवाशांच्या मृत्युप्रकरणी रेल्वे प्रशासनाविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा 302 गुन्हा दाखल करा!@INCMaharashtrapic.twitter.com/v5BU2aEEBb
— R Vikhe Patil (@RVikhePatil) September 29, 2017
.....आणि मुंबई पोलिसांनी माणुसकीचाही बळी घेतला!
एलफिन्स्टन रेल्वे स्टेशनवर झालेल्या दुर्घटनेत २२ लोकांचे बळी गेले. मात्र या घटनेत माणुसकीचाही बळी गेला. मुंबई पोलिसांनी त्यांच्यातल्या उरल्या सुरल्या माणुसकीला मूठमाती देऊन त्यावर स्वत:च्या पराक्रमाचा झेंडाच लावलाय. जे २२ लोक मेले त्यांच्या कपाळावर १ ते २२ असे नंबर लिहिण्याचे शौर्यकाम मुंबई पोलिसांनी केले आहे. विशेष म्हणजे मृतांचे कपाळावर नंबर लिहिलेले हे फोटो पोलिसांनी रिलीज केले आहेत. जनाचीही नाही आणि मनाचीही नाही, आम्हाला लाजच उरली नाही...! या मृतांमध्ये जर तुमचे कोणी नातेवाईक असते, कोणाची आई असती, कोणाची बहीण असती तर तुम्ही त्यांच्या कपाळावर नंबर लिहिण्याची हिंमत केली असती का ? २२ मृतदेह होते. त्यांच्या नातेवाईकांनी चेह-यावरूनही ते ओळखले असते. त्यासाठी त्यांच्या कपाळावर नंबर लिहून त्या मृतदेहांची विटंबना करण्याची हिंमत पोलिसांची झालीच कशी? ज्यांनी कोणी हे केले त्याची वर्दी तातडीने काढून घेतली पाहिजे. नियतीनेच ज्यांच्या कपाळी असा दुर्दैवी मृत्यू लिहिला त्यांच्या कपाळावर ते मेल्यावर असा नंबर लिहून विटंबना करण्याची कल्पना तरी पोलिसांच्या मनात कशी येऊ शकते.
परळ चेंगराचेंगरी दुर्घटनेला काँग्रेसच जबाबदार, भाजपाच्या किरीट सोमय्यांनी फोडलं खापर
भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी पररळ-एलफिन्स्टन रेल्वे पुलावरील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेचे खापर काँग्रेसवर फोडले आहे. गेल्या 15 वर्षांपासून मागणी होत असतानाही काँग्रेस सरकारने या पुलाचा प्रश्न सोडवला नाही, म्हणून ही दुर्घटना घडल्याच्या उलट्या बोंबा सोमय्या यांनी लगावल्या आहेत. दुर्घटना स्थळाला भेट दिल्यावर त्यांनी दुर्घटनेबाबत खेद व्यक्त केला. मात्र घटनेचे खापर त्यांनी काँग्रेसवरच फोडले. तीन वर्षापासून भाजपा मोठ्या प्रमाणात रेल्वेच्या समस्यांवर काम करत आहे. मात्र यापुढील काम युद्ध पातळीवर करण्याची गरजही यावेळी त्यांनी व्यक्त केली.