‘भूतबाधा’ उतरविण्याच्या नावाखाली निलंबित पोलिसाने महिलेची केली पाच लाखांची फसवणूक
By admin | Published: December 30, 2016 08:16 PM2016-12-30T20:16:09+5:302016-12-30T20:16:09+5:30
मनोहर पाटोळे या निलंबित पोलिसाने चक्क पोलीस हवालदार महिलेच्याच बहिणीची फसवणूक केली.
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 30 - ‘तुला भूतबाधा आणि करणी उतरविण्याच्या नावाखाली मनोहर पाटोळे या निलंबित पोलिसाने चक्क पोलीस हवालदार महिलेच्याच बहिणीची फसवणूक केली. तिच्याकडून त्याने गेल्या वर्षभरात पाच लाख ९७ हजार रुपये उकळले. आता याप्रकरणी जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला असून, त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे राबोडी पोलिसांनी सांगितले.
ठाण्याच्या खारकर आळीतील नवीन पोलीस वसाहतीमध्ये ही महिला वास्तव्याला आहे. तिची बहीण पोलीस असल्यामुळे तिची जरीमरी पोलीस वसाहतीमध्ये राहणाऱ्या पाटोळेशी ओळख झाली. तिला त्याने कोणी तरी करणी केल्याचे सांगितले. जादूटोणा आणि भूतबाधाही केलेली आहे. आपल्या अंगात शक्ती असल्याचा दावा करीत हे सर्व उतरविण्यासाठी त्याने काही खर्च करावा लागेल, असेही सांगितले. त्यासाठी तिने सुरुवातीला त्याला ४० हजारांची रोकड दिली. अर्थात इतकी रक्कम देऊनही कथित ‘करणी’ काही केल्या उतरत नसल्याचेही त्याने भासविले. तिने त्याच्यावर अंधविश्वास ठेवत पुन्हा त्याच्या मागणीप्रमाणे त्याला दहा आणि १२.५ ग्रॅम वजनाच्या ७२ हजार ४०० रुपयांच्या दोन सोनसाखळ्याही त्याला दिल्या. एवढ्यावरही मात्र लागू न झाल्याचे सांगत त्याने आणखी काही पैशांची मागणी केली. तेव्हा तिने सोन्याचे मंगळसूत्र आणि काही दागिने विकून रोख ३३ हजार रुपये त्याला दिले. त्यानंतरही त्याने काही मंत्रोपच्चार आणि पूजापाठ करण्याच्या नावाखाली तिच्याकडून दहा हजार रोकड तसेच एका लाख ३० हजारांच्या दोन सोन्याच्या बांगड्या आणि दोन लाख २३ हजार आणि ३६ हजारांचे दागिने गहाण ठेवून मिळविलेली रक्कम असे पाच लाख ९७ हजार रुपये तिच्याकडून उकळले. आपण सांगतो तसे न ऐकल्यास वाईट परिणाम होतील, अशी भीती दाखवित त्याने तिच्याकडून ही रक्कम उकळली.
जानेवारी २०१६ ते ८ एप्रिल २०१६ या कालावधीत माजीवडा येथील एका हॉटेलात तसेच ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात त्याने ही रक्कम वेगवेगळ्या वेळी घेतली. आपली यात फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने राबोडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी फसवणूक तसेच महाराष्ट्र नरबळी इतर अमानुष अनिष्ठ प्रथा, जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व समूळ उच्चाटन करण्याबाबतच्या कायद्यानुसार २९ डिसेंबर रोजी सायंकाळी गुनहा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक राम कोळी हे अधिक तपास करीत आहेत.