बनावट रेशन कार्डप्रकरणी तिघे निलंबित
By admin | Published: April 21, 2015 01:16 AM2015-04-21T01:16:42+5:302015-04-21T01:16:42+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मातब्बर नेत्यांच्या नावाने बोगस रेशन कार्ड तयार करण्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव
संदीप प्रधान, मुंबई
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मातब्बर नेत्यांच्या नावाने बोगस रेशन कार्ड तयार करण्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील प्रकरणात तहसीलदास अशोक टेंभरे यांच्या निलंबनाची शिफारस करण्यात आली असून, जिल्हा पुरवठा अधिकारी एस. बी. भराडी, लिपिक एस. जी. पारखेडकर व निरीक्षण अधिकारी के. यू. फुके यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात तहसीलदाराने सहा हजार बोगस रेशन कार्डे तयार केल्याचा आरोप भाजपाचे विधान परिषद सदस्य पांडुरंग फुंडकर यांनी केला होता. यामध्ये पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री फडणवीस यांच्याखेरीज अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नावे तयार केलेल्या रेशन कार्डांचा समावेश होता.
अन्न व नागरी पुरवठा खात्याचे सचिव दीपक कपूर यांनी सांगितले की, याबाबत चौकशी पूर्ण झाली असून तहसीलदाराच्या निलंबनाची शिफारस महसूल खात्याला केली आहे. याखेरीज आपल्या खात्याशी संबंधित तीन अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.
राज्य शासन रेशन कार्ड तहसीलदाराकडे सोपवते. खामगावच्या तहसीलदाराने त्यांच्या ताब्यातील सहा हजार रेशन कार्डे त्यांच्या क्षेत्रातील २७ दुकानदारांना प्रत्येकी २०० याप्रमाणे वाटली. रेशन दुकानदारांनी ही रेशन कार्डे मोदी, फडणवीस, बापट वगैरेंच्या नावे तयार करून त्यावर धान्य उचलल्याचे दाखवून धान्याचा काळाबाजार केला. विशेष बाब म्हणजे राजकीय नेत्यांच्या नावांनी बोगस रेशन कार्डे तयार करताना त्यांच्या कुटुंबीयांची नावे व वय अचूक लिहिली जातील याची काळजी घेतलेली आहे. रेशन कार्ड दुकानदार गेले दीड वर्ष या कार्डांवर धान्य उचलत होते.
या संपूर्ण व्यवहारात सरकारी अधिकारी-कर्मचारी आणि रेशन दुकानदार यांच्यात रेशन कार्डे देण्याच्या बदल्यात आर्थिक व्यवहार झाल्याची शंका सरकारला असल्याने या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून पोलिसी चौकशी सुुरू केलेली आहे.