निलंबित अधीक्षक आॅनड्युटीच! भायखळा कारागृहात गोंधळ सुरूच; मुख्यमंत्री, गृहराज्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 04:17 AM2017-08-05T04:17:23+5:302017-08-05T04:17:29+5:30
वॉर्डन मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणात विधिमंडळात मुख्यमंत्री आणि गृहराज्यमंत्री यांनी कारागृहातील दोन अधीक्षकांना निलंबित केले. मात्र, त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत, अधीक्षक तानाजी घरबुडवे, चंद्रमणी इंदुरकर आॅनड्युटी आहेत.
मनीषा म्हात्रे ।
मुंबई : वॉर्डन मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणात विधिमंडळात मुख्यमंत्री आणि गृहराज्यमंत्री यांनी कारागृहातील दोन अधीक्षकांना निलंबित केले. मात्र, त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत, अधीक्षक तानाजी घरबुडवे, चंद्रमणी इंदुरकर आॅनड्युटी आहेत. ते भायखळा कारागृहातील कारभार पाहत असून, कर्मचाºयांवर दबाव आणत असल्याचे तेथील कर्मचाºयाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
मंजुळाचा मृत्यू झाला, त्या दिवशी चंद्रमणी इंदुरकर दोन दिवसांच्या प्रशिक्षणासाठी पुण्यात होते. त्यानंतर रात्री मंजुळाचा मृत्यू झाल्याबाबत त्यांना महिला अधिकाºयाने कळविले. तरीदेखील ते कारागृहात हजर राहिले नाहीत. त्यांना कारागृह महानिरीक्षकांनी कामावर हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, ते हजर झाले नाहीत. मंजुळाच्या हत्येची माहिती समजताच कारागृहातील महिलाकैद्यांनी गोंधळ घातला. तरीही त्यांनी पुण्याहून मुंबईला येण्याऐवजी नाशिकला गावी जाणे पसंत केले. तेथे त्यांची खासगी कामे उरकून दुपारी ३.३०-४च्या सुमारास ते नाशिकवरून मुंबईत आले. तोपर्यंत वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. कारागृहातील परिस्थिती व्यवस्थित न हाताळल्यामुळे, रात्री ११ वाजेपर्यंत कारागृहात दंगल सुरू होती.
१ आॅगस्टला विधिमंडळात घरबुडवे, इंदुरकरांच्या निलंबनाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी केली. तरीही ते आॅनड्युटी आहेत. निलंबनाचा राग कर्मचाºयांवर काढत असल्याचे कर्मचाºयाने ‘लोकमत’ला सांगितले. त्यांना पुराव्यांमध्ये फेरफार करण्यास संधी मिळत आहे. दोघांनीही वरिष्ठांकडे निलंबन मागे घेण्यासाठी फिल्डिंग लावली असून, मंत्रालयाच्या खेपा वाढवल्याचेही कर्मचाºयाचे म्हणणे आहे. दुसरीकडे निलंबनाचे आदेश मिळाले नसल्याचे कारागृह अधिकाºयांकडून समजते.