‘उमवि’च्या कुलगुरुपदाचा ‘सस्पेन्स’
By admin | Published: October 25, 2016 03:59 AM2016-10-25T03:59:18+5:302016-10-25T03:59:18+5:30
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरुपदाच्या निवडीचा ‘सस्पेन्स’ सध्या खान्देशातील शैक्षणिक विश्वात चर्चेचा विषय ठरला आहे. २० आॅक्टोबर रोजी दुपारी अंतिम मुलाखती
- राहुल रनाळकर, मुंबई
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरुपदाच्या निवडीचा ‘सस्पेन्स’ सध्या खान्देशातील शैक्षणिक विश्वात चर्चेचा विषय ठरला आहे. २० आॅक्टोबर रोजी दुपारी अंतिम मुलाखती पार पडून देखील राजभवनातून सोमवारी, २४ आॅक्टोबर रोजी देखील कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.
राजभवनाच्या प्रोटोकॉलनुसार अंतिम पाच जणांच्या मुलाखती पार पडल्यानंतर अवघ्या तासाभराच्या आत कुलगुरुंची निवड अधिकृतरित्या घोषित केली जाते. तथापि, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरुंची निवड प्रक्रिया सध्या कमालीची लांबली आहे, याचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरु निवड प्रक्रियेचा मुद्दा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अभाविप आणि संघ परिवाराशी संबंधित सर्वच संघटनांनी प्रतिष्ठेचा केला आहे. संघ जरी प्रत्यक्ष कोणत्याही निर्णय प्रक्रियेत सामील होत नसला, तरी देखील चांगल्या लोकांची पारख करुन नाव सुचवण्यासाठी संघाच्या स्थानिक कार्यकर्त्यांची मदत घेण्यात येते. एका शिस्तबद्ध आणि सचोटी असलेल्या व्यक्तीच्या नावावर एकमत होऊन ते नाव पुढे नेण्यात आले. तर विरोधी गटातील अर्थात माजी कुलगुरुंनीही त्यांच्या माणसांसाठी दिल्लीपासून गल्लीपर्यंत चांगलीच मोर्चेबांधणी केली. अखेर २० आॅक्टोबरला बहुप्रतिक्षित अंतिम मुलाखती पार पडल्या. संकेतानुसार अंतिम मुलाखती ही केवळ औपचारिकता असते. मुलाखतीनंतर केवळ घोषणा हीच महत्त्वाची बाब मानली जाते. सोमवारी दुपारी घोषणा होणारच असा कयास लावण्यात येत होता. तथापि संध्याकाळ होऊनही घोषणा न झाल्याने मोठा हिरमोड झाला.
डॉ. पाटील नवे कुलगुरु?
गुरुवार, २० आॅक्टोबरपासून कुलगुरुपदाची माळ कोणाच्या गळ््यात पडणार याच्या तर्क वितर्कांना चांगलेच उधाण आले. शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर डॉ. पी. पी. पाटील यांचे पारडे सगळ््यात जड आहे. तर त्यांना डॉ. ए. एम. महाजन यांचे आव्हान आहे. सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार डॉ. पी. पी. पाटील यांची निवड राजभवनाने केलेली आहे. तथापि, काही ‘अनाकलनीय कारणे’ पुढे करुन ही घोषणा अद्याप झालेली नाही.