चारही कृषी विद्यापीठांच्या अधिस्वीकृतीला स्थगिती
By Admin | Published: June 5, 2016 12:43 AM2016-06-05T00:43:20+5:302016-06-05T00:43:20+5:30
राज्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी
पुणे : राज्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली या विद्यापीठांच्या अधिस्वीकृतीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे चारही विद्यापीठांचे अनुदान सध्या थांबविण्यात आले आहे.
राष्ट्रीय कृषी शिक्षण अधिस्वीकृती मंडळाच्या परीक्षण समितीने चारही कृषी विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालये, विद्यापीठातील प्राध्यापक, अधिष्ठाता, प्राचार्यांची रिक्त पदे, पायाभूत सोयीसुविधा यांची गेल्या वर्षी पाहणी केली. त्यात चारही विद्यापीठांतील जवळपास ५० टक्के पदे रिक्त असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संपूर्ण व्यवस्था मोडकळीस आल्याची स्थिती अधिस्वीकृती मंडळाच्या समोर आली. त्यानुसार मंडळाने अधिस्वीकृतीला तात्पुरती स्थगिती दिली. मंडळाच्या २८ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मंडळाची पुढील सहा महिन्यांत बैठक होईल. तोपर्यंत याबाबतीत राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेणे अपेक्षित आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या आकडेवारीनुसार, राज्यात एकूण १९० कृषी महाविद्यालये असून त्यापैकी तब्बल १५६ महाविद्यालये खासगी विनानुदानित आहेत. या महाविद्यालयांची १२ हजार १६० एवढी प्रवेश क्षमता आहे.
परीक्षण समितीच्या अहवालानुसार बारापैकी केवळ एक संचालक नियमित आहे. पाचच विभागप्रमुख पूर्णवेळ कार्यरत आहेत. बहुतेक महाविद्यालयांना प्राचार्य नाहीत. काही पत्र्याच्या शेडमध्ये सुरू आहेत. काही महाविद्यालयांमध्ये एकही प्राध्यापक नाही. दुसऱ्या महाविद्यालयांतील प्राध्यापक तेथील विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी येतात.
- डॉ. एस. एस. मगर, सदस्य, राष्ट्रीय कृषी शिक्षण अधिस्वीकृती मंडळ
—-
खासगी महाविद्यालयांचा मोठा बोजा विद्यापीठांवर पडला आहे. त्यामुळे या महाविद्यालयांच्या परीक्षा घेणे, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याबाबत स्वतंत्र यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे. त्यासाठी माझ्यासह इतर कुलगुरूंनीही सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, त्यावर काहीच निर्णय झाला नाही.
- डॉ. तुकाराम मोरे, माजी कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी
——-
प्रवेशप्रक्रिया होणार
चारही कृषी विद्यापीठांची अधिस्वीकृती तात्पुरती स्थगित करण्यात आली असली तरी सध्या सुरू असलेल्या किंवा यापुढे होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेमध्ये कोणताही अडथळा येणार नाही. ही प्रक्रिया सुरू राहून प्रवेश नियमानुसार होतील. सध्या केवळ अनुदान थांबविण्यात आले आहे, असे डॉ. एस. एस. मगर यांनी स्पष्ट केले.