प्लास्टिक बाटल्यांमधून मद्यविक्रीबंदीला स्थगिती
By admin | Published: April 2, 2016 01:35 AM2016-04-02T01:35:06+5:302016-04-02T01:35:06+5:30
प्लॅस्टिकच्या बाटल्यांमधून मद्य विकण्यास मनाई करणाऱ्या राज्य सरकारच्या अधिसूचनेवर शुक्रवारी उच्च न्यायालयाने ३० जूनपर्यंत स्थगिती दिली. १ एप्रिलपासून या अधिसूचनेवर अंमलबजावणी होणार होती.
मुंबई : प्लॅस्टिकच्या बाटल्यांमधून मद्य विकण्यास मनाई करणाऱ्या राज्य सरकारच्या अधिसूचनेवर शुक्रवारी उच्च न्यायालयाने ३० जूनपर्यंत स्थगिती दिली. १ एप्रिलपासून या अधिसूचनेवर अंमलबजावणी होणार होती.
पेट बाटल्यांमधून विकण्यात येणाऱ्या मद्यामुळे लोकांच्या आरोग्यास अपाय होऊ शकतो. तसेच यामुळे सरकारच्या महसूलावरही परिणाम होत आहे, असे म्हणत सरकारने ११ जानेवारी रोजी पेट बाटल्यांमधून मद्यविक्री करण्यास मनाई करणारी अधिसूचना काढली. या अधिसूचनेवर १ एप्रिलपासून अंमलबजावणी करण्यात येईल, असेही सरकारने स्पष्ट केले होते.
मात्र या अधिसूचनेला विरोध करणाऱ्या याचिकांवरील सुनावणी मुख्य न्या. डी. एच. वाघेला व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे होती. काचेच्या व प्लॅस्टिकच्या फेकलेल्या बाटल्या जमा करण्यासाठी उत्पादकांनी माणसे नियुक्त करावीत. या माणसांना पुरेसा मोबदला द्यावा, अशी सूचना खंडपीठाने गेल्या सुनावणीवेळी उत्पादक कंपन्यांना दिली होती. या मॉडेलवर काम करण्याची हमी उत्पादकांनी दिल्यानंतर हायकोर्टाने ३० जूनपर्यंत अधिसूचनेवर स्थगिती दिली. खंडपीठाने या याचिकेवरील सुनावणी १४ जून रोजी ठेवली आहे. (प्रतिनिधी)