आश्रमशाळा कर्मचाऱ्यांची उपोषणाला स्थगिती
By admin | Published: April 29, 2017 03:28 AM2017-04-29T03:28:25+5:302017-04-29T03:28:25+5:30
आश्रमशाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अनुदानाची मागणी करत सुरू केलेले आझाद मैदानातील बेमुदत उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे
मुंबई : आश्रमशाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अनुदानाची मागणी करत सुरू केलेले आझाद मैदानातील बेमुदत उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी शुक्रवारी आझाद मैदानात येऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली. शिवाय येत्या १५ दिवसांत अनुदानाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर केंद्रीय अनुसूचित जाती निवासी आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी पाठपुरावा करू, असे कांबळे यांनी सांगितले. तर संघटनेचे उपाध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांनी आश्वासनाची पूर्तता न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)