प्रत्युषा बॅनर्जीवरील लघुपट प्रदर्शित करण्यास स्थगिती
By admin | Published: April 2, 2017 01:47 AM2017-04-02T01:47:14+5:302017-04-02T01:47:14+5:30
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या आयुष्यावर आधारित ‘हम कुछ कह ना सके’ हा लघुपट प्रदर्शित करण्यास दिंडोशी न्यायालयाने स्थगिती दिली. हा लघुपट शनिवारी प्रदर्शित होणार होता.
मुंबई : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या आयुष्यावर आधारित ‘हम कुछ कह ना सके’ हा लघुपट प्रदर्शित करण्यास दिंडोशी न्यायालयाने स्थगिती दिली. हा लघुपट शनिवारी प्रदर्शित होणार होता.
प्रत्युषा बॅनर्जीचा प्रियकर आणि तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप असलेला राहुल राज सिंग याने या लघुपटाविरुद्ध दिंडोशी सत्र न्यायालयात धाव घेतली. सिंग याच्या म्हणण्यानुसार, प्रत्युषा बॅनर्जीच्या जीवनावर तयार केलेल्या या लघुपटात त्याची बदनामी करण्यात आली
आहे. त्यामुळे या लघुपटामुळे खटल्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल. त्यातच कामया पंजाबीने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिने या चित्रपटाद्वारे त्याच्या मैत्रिणीला (प्रत्युषा बॅनर्जी) श्रद्धांजली वाहिल्याचे म्हटले आहे. याकडेही याचिकेद्वारे लक्ष वेधण्यात आले आहे.
या प्रकरणी दिंडोशी न्यायालयाने लघुपट प्रदर्शनाला तुर्तास स्थगिती दिली असून कामया पंजाबीला याबाबत उत्तर देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. (प्रतिनिधी)