दोन अधिकाऱ्यांना निलंबनाचा डोस!
By admin | Published: April 12, 2016 05:02 AM2016-04-12T05:02:11+5:302016-04-12T05:02:11+5:30
बेलगाम औषध खरेदी करून त्यांचे मनमानी वाटप करण्याप्रकरणी राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे उपसंचालक डॉ. राजू जोतकर आणि खरेदी कक्षातील तत्कालीन सहायक संचालक डॉ. सचिन देसाई
- अतुल कुलकर्णी, मुंबई
बेलगाम औषध खरेदी करून त्यांचे मनमानी वाटप करण्याप्रकरणी राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे उपसंचालक डॉ. राजू जोतकर आणि खरेदी कक्षातील तत्कालीन सहायक संचालक डॉ. सचिन देसाई यांना सरकारने तत्काळ निलंबित केले आहे. तशी घोषणा आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधानसभेत केली. ‘लोकमत’ने उघडकीस आणलेल्या या प्रकरणाचे विधिमंडळात तीव्र पडसाद उमटले. विधान परिषदेचे कामकाज दोनवेळा बंद पडले तर विधानसभेत गदारोळातच मंत्र्यांनी निवेदन सादर केले.
२९७ कोटींच्या औषध खरेदीप्रकरणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी परिषदेत स्थगन प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव स्वीकारणे कसे योग्य आहे, याची त्यांनी मांडणी केली; मात्र सभापती रामराजे निंबाळकर यांनी तो फेटाळला. तर त्यावर मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी निवेदन करण्यास सुरुवात केली. स्थगन नाकारल्यानंतर निवेदन कसे करता येईल, असा मुद्दा उपस्थित झाला आणि सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. शेवटी सभागृह दोनवेळा तहकूब करावे लागले. विधानसभेतही डॉ. सावंत यांना निवेदन करण्यास आडकाठी केली गेली.
कोणतीही चर्चा सुरू झालेली नसताना मंत्र्यांनी दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची घोषणा करून भ्रष्टाचारावर शिक्कामोर्तब केले आहे. मात्र यात मोठे अधिकारी अजूनही मोकाट आहेत. झाल्या प्रकरणाची सगळी माहिती आम्ही सभागृहात पुराव्यानिशी ठेवणार आहोत, असेही मुंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
औषध खरेदी प्रकरणी तपास करण्यासाठी उच्चस्तरीय अधिकाऱ्याची एक सदस्यीय समिती नेमण्यात येत असल्याची घोषणाही या वेळी मंत्री डॉ. सावंत यांनी केली. मंत्र्यांच्या निवेदनाने आमचे समाधान झालेले नाही, आम्ही हा प्रश्न विधानसभेत उपस्थित करणार आहोत, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.