कपिल शर्मावरील एफआयआरला स्थगिती
By admin | Published: March 24, 2017 02:02 AM2017-03-24T02:02:21+5:302017-03-24T02:02:21+5:30
गोरेगावमधील फ्लॅटमध्ये बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी हास्य कलाकार कपिल शर्माविरुद्ध नोंदवण्यात आलेल्या एफआयआरला उच्च न्यायालयाने गुरुवारी स्थगिती दिली
मुंबई : गोरेगावमधील फ्लॅटमध्ये बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी हास्य कलाकार कपिल शर्माविरुद्ध नोंदवण्यात आलेल्या एफआयआरला उच्च न्यायालयाने गुरुवारी स्थगिती दिली. तर महापालिकेला हे प्रकरण पाच आठवड्यांत निकाली कढण्याचे निर्देश देत कपिलने केलेली याचिका निकाली काढली.
गोरेगावमधील ‘डीएलएच एनक्लेव्ह’ या १८ मजली इमारतीमध्ये कपिल शर्मा आणि बॉलीवूड अभिनेता इरफान खान राहत आहेत. त्यांनी आवश्यक ती परवानगी न घेता फ्लॅटमध्ये अतिरिक्त बांधकाम केल्याचा आरोप करत महापालिकेने या दोघांनाही एप्रिल व सप्टेंबर २०१६ मध्ये नोटीस बजावली आणि दोघांनाही बांधकाम पाडण्यास सांगितले.
या दोघांनी या नोटीसला उच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकांवरील सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे होती.
गुरुवारच्या सुनावणीत महापालिकेने या दोघांना महापालिका कायद्यातील कलम ३५० अंतर्गत बजावलेली नोटीस मागे घेतल्याची माहिती उच्च न्यायालयाला दिली. त्यामुळे खंडपीठाने कपिल शर्मावर करण्यात आलेल्या एफआयआरवर स्थगिती दिली. (प्रतिनिधी)