आकाशवरील कारवाईला स्थगिती
By admin | Published: March 3, 2017 02:29 AM2017-03-03T02:29:50+5:302017-03-03T02:29:50+5:30
वाशी सेक्टर १० मधील धोकादायक झालेल्या एफ ४ टाईप इमारतीचा पुनर्विकास करून आकाश टॉवर उभारण्यात आला
नवी मुंबई : वाशी सेक्टर १० मधील धोकादायक झालेल्या एफ ४ टाईप इमारतीचा पुनर्विकास करून आकाश टॉवर उभारण्यात आला आहे. या टॉवरची बांधकाम परवानगी आयुक्तांनी रद्द करून एक महिन्यात इमारत पाडून टाकण्याची नोटीस दिली होती. या नोटीसला उच्च न्यायालयाने स्थगीती दिली असून येथील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.
सिडकोने बांधलेल्या या इमारतीचे बांधकाम धोकादायक झाल्यामुळे १२ सदनीकाधारक व ८ दुकानदारांनी २०१० मध्ये इमारतीच्या पुनर्बांधनीचा निर्णय घेतला होता. जानेवारी २०१० मध्ये सोसायटीमधील रहिवाशांनी बांधकाम परवानगीसाठी अर्ज केला होता. पण सिडकोची ना हरकत परवानगीची मागणी पालिकेने केली होती. मनपाची कोणतीही हरकत नसल्यास आम्ही परवानगी देवू असे सिडकोने कळविले होते. मनपाने तसे पत्र दिल्यानंतर त्याअधीन राहून बांधकाम परवानगी दिली होती. पण नंतर सिडकोकडे वारंवार परवानगी मागूनही ना हरकत प्रमाणपत्र दिले नाही. अखेर दिड एफएसआय प्रमाणे बांधकाम सुरू करण्यात आले. ना हरकत परवानगीसाठी न्यायालयात धाव घेण्यात आली. या सर्व प्रक्रियेमध्ये सहा वर्षाचा कालावधी गेला आहे.
महापालिकेचे यापुर्वीचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आकाश विषयी न्यायालयात प्रतिज्ञापत्र देवून दिलेली परवानगी धुडकावून इमारत अनधिकृत असल्याची व बांधकाम ३२ दिवसामध्ये पाडून टाकण्याची नोटीस जारी केली आहे. या नोटीसला उच्च न्यायालयात आव्हाण देण्यात आले होते. आकाशविषयी प्रकरण न्यायप्रवीष्ट असल्याने उच्च न्यायालयाने पालिकेच्या नोटीसला स्थगीती दिली असून रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.