वर्गात फोनवर बोलणाऱ्या शिक्षकाचे निलंबन
By admin | Published: February 5, 2017 01:35 AM2017-02-05T01:35:01+5:302017-02-05T01:35:01+5:30
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शाळेत शिकवत असताना फोनवर बोलू नये, असे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. मात्र तरीही नियमाचे उल्लंघन करणाऱ्या एका शिक्षकाचे पनवेल
पनवेल : शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शाळेत शिकवत असताना फोनवर बोलू नये, असे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. मात्र तरीही नियमाचे उल्लंघन करणाऱ्या एका शिक्षकाचे पनवेल महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी शुक्रवारी तडकाफडकी निलंबन केले. ज्ञानेश्वर रामचंद्र आलदर असे शिक्षकाचे नाव आहे.
वर्ग सुरू असताना ज्ञानेश्वर आलदर हे शिक्षक फोनवर बोलत असल्याचे आढळून आले. आयुक्तांनी आलदर यांना यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी आयुक्तांचे आरोप फेटाळले. मी विद्यार्थ्यांना फोनवरून शिकवत असल्याचे उत्तर त्यांनी दिले. या वेळी आयुक्तांनी त्वरित विद्यार्थ्यांना विचारले असता त्यांनी नाही असे उत्तर दिले. त्यामुळे शिक्षकांचे बिंग फुटल्याने आयुक्तांनी त्यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले. असे प्रकार घडत असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असल्याचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)