दोन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 01:14 AM2017-07-19T01:14:24+5:302017-07-19T01:14:24+5:30

नेवाळी येथे शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. या आंदोलनात हलगर्जी केल्याचा ठपका ठेवत पोलीस आयुक्तांनी दोन पोलीस अधिकाऱ्यांना

Suspension of two police officers | दोन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन

दोन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : नेवाळी येथे शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. या आंदोलनात हलगर्जी केल्याचा ठपका ठेवत पोलीस आयुक्तांनी दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. तर एकाची बदली ठाणे मुख्यालयात केली आहे. निलंबित केलेल्यांमध्ये हिललाइन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन वाघमारे व सहायक पोलीस निरीक्षक कौराती यांचा समावेश आहे. तर पोलीस निरीक्षक विजय पवार यांची ठाणे मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.
१० जूनला नेवाळी येथील शेतकऱ्यांनी नौदलाकडून उभारण्यात येत असलेल्या संरक्षक भिंतीच्या निषेधार्थ मुंडन आंदोलन केले होते. २२ जूनला सकाळी भाल गावापासून शांततेच्या मार्गाने नेवाळी नाक्यापर्यंत मोर्चा काढण्याचा इशारा जमीन बचाव आंदोलन समितीने दिला होता. पोलिसांनी त्याला परवानगी दिली होती. मात्र, नेवाळी नाक्यावर खोणीच्या दिशेने, अंबरनाथच्या दिशेने, मलंगगड्या दिशेने आणि भाल गावाच्या दिशेने बराच जमाव एकाच वेळी चालून येत होता. त्यामुळे मोर्चाचे स्वरूप मोठे होते. तो आवरण्यासाठी पोलिसांनी लाठीमार सुरू केला. आंदोलक उग्र झाले. त्यांनी जाळपोळ सुरू केली. या घटनेत आंदोलकांकडून १२ पोलीस जखमी झाले. पोलिसांना पॅलेट गनचा वापर करावा लागला. त्यात १४ शेतकरी जखमी झाले.
२२ जुलैला पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार पोलीस आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केल्याची चर्चा आहे. पोलीस अधिकारी वाघमारे व कौराती यांना नेवाळी आंदोलनाचा फटका बसला आहे. मात्र पोलीस निरीक्षक विजय पवार हे तर आंदोलनात जखमी झाले होते. त्यांना कल्याणच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते जखमी झाले असल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई न होता त्यांची केवळ मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.

केवळ आश्वासनेच
- नेवाळीप्रकरणी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जमखींची भेट घेत या प्रकरणाची चौकशी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशामार्फत करण्याची मागणी केली.
- भाजपाच्या खासदार व आमदारांनी दोन वेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. नेवाळी जमीन बचाव संघर्ष समितीनेही भेट घेतली.
- या सगळ्यावर मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले. आगरी, कोळी, कुणबी समाजाची बैठक झाली. केंद्रीय संरक्षण मंत्र्यांसोबत बैठक घेतली जाणार होती.
- पावसाळी विधिमंडळ अधिवेशनाचे काम बंद पाडण्याचा इशारा शिवसेना आमदार सुभाष भोईर यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या घरात घुसण्याचा इशारा देणारी सुकाणू समिती काय करते, याकडेही शेतकरी आशेने पाहत आहेत.

‘मॅट’मध्ये मागणार दाद
निलंबित पोलीस निरीक्षक मोहन वाघमारे व सहायक पोलीस निरीक्षक कौराती यांनी याविरोधात ‘मॅट’मध्ये दाद मागणार असल्याचे सांगितले.

Web Title: Suspension of two police officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.