गर्भलिंग चाचण्यांचा संशय?
By admin | Published: May 3, 2017 06:16 AM2017-05-03T06:16:26+5:302017-05-03T06:16:26+5:30
महानगरपालिका क्षेत्रामध्ये २०१६ च्या अखेरीस स्त्री जन्मदर घसरत असल्याचे निदर्शनास येवू लागले आहे. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात ८६६ व ८८५ सर्वात कमी प्रमाण
नामदेव मोरे / नवी मुंबई
महानगरपालिका क्षेत्रामध्ये २०१६ च्या अखेरीस स्त्री जन्मदर घसरत असल्याचे निदर्शनास येवू लागले आहे. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात ८६६ व ८८५ सर्वात कमी प्रमाण आहे. शहरात अनेक ठिकाणी गर्भलिंग चाचण्या होत असल्याचा आरोप होत आहे. याविषयी काही निनावी तक्रारी व गोपनीय पत्र पाठविण्यात आली आहेत. या विषयीच्या तक्रारींची दखल घेवून ठोस कारवाई करण्याची मागणी होवू लागली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये स्त्री जन्मदर राज्यातील इतर महापालिकांच्या तुलनेमध्ये सर्वाधिक होता. राज्य शासनाच्यावतीने २०१२ - १३ या वर्षामध्ये येथील आरोग्य यंत्रणेला व अधिकाऱ्यांना त्याविषयी सन्मानितही करण्यात आले होते. परंतु २०१६ या वर्षामध्ये जन्मदर घसरू लागला आहे. फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्यामध्ये १ हजार पुरूषांच्या तुलनेमध्ये स्त्री जन्मदर अनुक्रमे १०३५ व १०१७ एवढे होते. परंतु त्यानंतर हे प्रमाण कमी होवू लागले आहे. सप्टेंबरमध्ये हे प्रमाण ८९२ व नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये ८६६ व ८८५ एवढे होते. वार्षिक जन्मदर सरासरी चांगला दिसत असला तरी वर्षअखेरची स्थिती चिंताजनक आहे. शहरामध्ये गर्भलिंग चाचण्या होत असल्याचा संशय व्यक्त केला जावू लागला आहे. कोपरखैरणेमधील एका डॉक्टरने याविषयी लेखी तक्रारी आरोग्य विभागाकडे केल्या होत्या. परंतु ज्या नावाने या तक्रारी झाल्या तो डॉक्टरच अस्तित्वात नसल्याचे नंतर निदर्शनास आले होते. यानंतर कोपरखैरणेमधील एक रूग्णालयात अशाप्रकारे चाचण्या केल्या जात असल्याचा लेखी अहवाल पालिकेच्याच नागरी आरोग्य केंद्राच्यावतीने देण्यात आला आहे. या अहवालामुळे आरोग्य विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होवू लागले आहे. होणाऱ्या तक्रारींची गंभीर दखल घेवून गर्भलिंग चाचण्या होत असल्यास संबंधितांवर ठोस कारवाई करण्याची मागणी होवू लागली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने शहरातील रूग्णालये, दवाखाने, सोनोग्राफी सेंटर यांची नियमित तपासणी करण्यात यावी. कुठेही अवैध प्रकार होत असल्यास तत्काळ धाड टाकून कारवाई करण्याची गरज आहे. चुकीचे काम करणाऱ्यांविरोधात ठोस कारवाई केली तरच नवी मुंबईमधील स्त्री जन्मदर वाढू शकतो, असे मत व्यक्त केले जात असून महापालिकेच्या कारवाईकडे लक्ष लागले आहे.
शहरातील ४१ रूग्णालयांच्या कामकाजामध्ये त्रुटी
महानगरपालिकेने मागील एक महिन्यामध्ये शहरातील १८८ रूग्णालयांची तपासणी केली आहे. यामध्ये ४१ रूग्णालयांच्या कामकाजामध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. त्या सर्वांना नोटीस पाठविण्यात येणार असून नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय शहरातील ११६ पीएनडीटी सेंटरची तपासणी केली आहे. तीन सेंटरमध्ये त्रुटी आढळून आल्या असून त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे. शहरामध्ये ८८ शासनमान्य गर्भलिंग तपासणी केंद्र आहेत. त्या सर्वांची तपासणी केली असून ३२ केंद्रांमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. त्या सर्वांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर सतीश माने यांनी दिली आहे. याशिवाय सर्व क्लिनीकचीही तपासणी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
आरोप फेटाळले
सांगलीमधील गर्भपात केल्याचे प्रकरण निदर्शनास आल्यानंतर राज्य शासनाने सर्व महापालिका व जिल्हा प्रशासनास पत्रकार परिषद घेवून तीन वर्षातील स्त्री - पुरूष जन्मदराची माहिती देण्यास सांगितले होते. पण नवी मुंबई महापालिकेने पत्रकार परिषद घेतली नसल्याने टीका होवू लागली होती. याविषयी माहिती देताना आरोग्य विभागाने सांगितले की, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषद घेवू नका त्यामुळे गुन्हे करणारे सावध होतील. थेट धाडसत्र सुरू करा अशा सूचना दिल्याचे सांगितले. यानुसार धाडी टाकून कारवाई सुरू केल्याचेही डॉ. सतीश माने यांनी सांगितले.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये वार्षिक लिंग गुणोत्तर प्रमाण सरासरी समाधानकारक आहे. कुठेही चुकीचे काम होत असल्यास नागरिकांनी माहिती द्यावी, संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्यात येईल. याशिवाय आरोग्य विभागाच्यावतीने नियमित तपासणी सुरू असून त्रुटी आढळणाऱ्या रूग्णालयांवर कारवाई केली जात आहे.
- डॉ. रमेश निकम,
मुख्य आरोग्य अधिकारी
स्त्रीजन्मदर प्रमाण
वर्षप्रमाण
२०१२९१६
२०१३९१९
२०१४९२८
२०१५९१५
२०१६९३२
२०१६ वर्षातील
स्त्री जन्मप्रमाण
महिनालिंग गुणोत्तर
जानेवारी९३२
फेब्रुवारी १०३५
मार्च१०१७
एप्रिल ९३७
मे९३६
जून९९०
जुलै९२७
आॅगस्ट९८७
सप्टेंबर८९२
आॅक्टोबर९५७
नोव्हेंबर८६६
डिसेंबर८८५