रायगडच्या समुद्रात संशयास्पद बोट
By admin | Published: October 1, 2016 03:52 AM2016-10-01T03:52:58+5:302016-10-01T03:52:58+5:30
भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’च्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्याच्या समुद्रकिनारी शुक्रवारी सकाळी संशयास्पद बोट आढळल्याच्या चर्चेने खळबळ
अलिबाग : भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’च्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्याच्या समुद्रकिनारी शुक्रवारी सकाळी संशयास्पद बोट आढळल्याच्या चर्चेने खळबळ उडाली आहे. ही बोट दिसल्याची माहिती स्थानिक मच्छीमारांनी तटरक्षक दलाला दिली आहे. या बोटीतील लोकांनी मुंबईकडे जाण्याचा मार्ग मच्छीमारांना विचारला. मच्छीमारांनी दिलेल्या माहितीच्या पार्श्वभूमीवर या बोटीचा शोध सुरू केला आहे. तसेच किनारपट्टीवर गस्तही वाढवली आहे. (प्रतिनिधी)
किनारपट्टीवर हाय अॅलर्ट
रायगडचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी राष्ट्रीय सुरक्षिततेचे कारण देऊन याबाबत आताच काहीही माहिती देणे योग्य ठरणार नाही, असे स्पष्ट केले.
उरी येथील दहशतवादी हल्ला आणि भारत-पाकिस्तान सीमेवरील सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण रायगड जिल्ह्यासह किनारपट्टीला ‘हाय अलर्ट’वर ठेवण्यात आले आहे. कोणीही दिलेल्या माहितीची तात्काळ खातरजमा करण्यात येत असल्याची माहितीही हक यांनी दिली.