विषारी औषधाने विवाहितेचा संशयास्पद मृत्यू
By Admin | Published: May 19, 2017 07:18 PM2017-05-19T19:18:06+5:302017-05-19T19:18:06+5:30
नेहरुनगर तांडा (ता़ रेणापूर) येथील एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११़३० वाजताच्या सुमारास घडली
ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 19 - नेहरुनगर तांडा (ता़ रेणापूर) येथील एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११़३० वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे आण म्हणत सासरच्या मंडळींनीच विवाहितेस विषारी औषध पाजल्याचा आरोप माहेरच्या मंडळींनी केला आहे़ याप्रकरणी अद्यापही पोलिसांत नोंद नाही.
सोनाली उत्तम चव्हाण (२४, रा़ नेहरुनगर तांडा, ता़ रेणापूर) असे मयत विवाहितेचे नाव आहे़ अहमदपूर तालुक्यातील सांगवी (शि़) येथील सोनाली मेहरबान राठोड हिचा विवाह नेहरुनगर तांडा (ता़ रेणापूर) येथील उत्तम तुकाराम चव्हाण याच्यासोबत सन २०११ मध्ये झाला होता़ विवाहानंतर काही दिवसांतच सासरच्या मंडळींनी विवाहिता सोनाली हिला ट्रॅक्टर घेण्यासाठी व शेतावरील कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे आण म्हणून तगादा लावण्यात येऊ लागला़ नेहमीच्या होणाऱ्या या त्रासाला कंटाळून तिने पंधरा दिवसांपूर्वी रेणापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती़ परंतु, पोलिसांनी दोघांची समजूत पाठवून दिले होते़
दरम्यान, आठ दिवसांपूर्वी सोनाली ही माहेरी आली होती़ तेव्हा पती उत्तम याने तिला सासरी आणले़ गुरुवारी दुपारच्यावेळी तिला सासरच्या मंडळींनी विषारी औषध पाजले़ त्यानंतर ती आरडाओरड करु लागल्याने सायंकाळी लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात सासरच्या मंडळींनी दाखल केले़ उपचारादरम्यान, तिचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला.
मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
सोनाली हिच्या मृत्यूशी जबाबदार असणाऱ्या सासरच्या मंडळींविरुध्द गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी माहेरच्या मंडळींनी तिचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला़ सायंकाळी ७ वा़ पर्यंत तिचा मृतदेह ताब्यात घेतला नाही.
सासरच्यांनी केला घात
माहेरहून पैसे आण म्हणून सोनालीचा सासरच्या मंडळींकडून छळ होत असे़ पंधरा दिवसांपूर्वी तिने रेणापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती़ परंतु, पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही़ सासरच्या मंडळींनी तिला विषारी औषध पाजल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप सोनालीचे वडिल मेहरबान राठोड व नातेवाईकांनी केला.