साध्वी प्रज्ञासिंह यांना पाठविलेले संशयास्पद पत्र पुण्यातील खडकीतून..
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 08:59 PM2020-01-14T20:59:49+5:302020-01-14T21:17:30+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे फोटोंचाही समावेश..
पुणे : भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या भोपाळ येथील घश्री पोस्टाद्वारे मिळालेले संशयास्पद पत्र हे पुण्यातून पाठविण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या पत्रावर शिवाजी चौक, खडकी बाजार, खडकी, ता़. जिल्हा पुणे, महाराष्ट्र, इंडिया असा पत्ता दिला आहे. स्वामी रामचंद्र अय्यर ईश्वरचंद असे पत्र पाठविणाऱ्यांचा उल्लेख पत्रावर करण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पुणे पोलिसांकडे कोणत्याही यंत्रणेने अद्यापपर्यंत संपर्क साधला नाही. तसेच चौकशीबाबत तक्रार आलेली नाही, अशी तक्रार मिळाल्यास त्या अनुषंगाने तपास करण्यात येईल, असे विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त मितेश घट्टे यांनी सांगितले.
साध्वी प्रज्ञासिंह यांना पाठविण्यात आलेले हे पत्र उर्दु भाषेत लिहिलेले आहे. या पत्रासोबत दोन पुड्यांमध्ये पांढऱ्या रंगाची पावडर आहे. या पावडरला हात लावल्यामुळे खाज सुटत असल्याचे तपासात समोर आले आहे. या पाकिटातून पाठविलेल्या पत्राबरोबर आणखी काही पाने असून त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे फोटोंचाही समावेश आहे. त्यावर लाल पेनाने संशयास्पद खुणा करण्यात आलेल्या आहेत. तसेच फोटोसमोर या सर्वांवर बंदुक रोखल्याचे दिसून येते. घटनेची माहिती मिळताच भोपाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पत्र व त्यासोबत आलेली पावडर ताब्यात घेऊन तपासाला सुरुवात केली आहे.
पुणे पोलिसांकडे अशा पत्राबाबत कोणत्याही यंत्रणेने अद्याप पर्यंत संपर्क साधला नाही. तसेच चौकशीसाठीही तक्रार आलेली नाही. अशी तक्रार मिळाल्यास त्या अनुषंगाने तपास करण्यात येईल,असे विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त मितेश घट्टे यांनी सांगितले.
-------------------------------------------------
हे एका पाकिटातून पाठविलेले साधे पत्र आहे. त्यामुळे त्याची नोंद नसल्याचे या पत्राचा टपाल खात्यात त्याची नोंदणी नसते. त्यामुळे या पत्राचा माग काढणे अवघड असते. शहरातील टपाल पेट्या किंवा टपाल कार्यालयात जमा होणारी पत्रे गोळा केली जातात. त्या टपालांचे राज्य, गावांनुसार वेगळी केली जातात. त्यावर शिक्के मारुन नंतर ती आरएमएस विभागाकडे पाठविली जातात. आरएमएस विभागाकडून संबंधित गावांकडे ही पत्रे पाठविली जातात. साधे पत्रांची नोंद नसल्याने ते पत्र नेमके कोणी पाठविले याची नोंद नसते.