शालीमार एक्सप्रेसमध्ये संशयास्पद टिफिन बॉक्स
By Admin | Published: June 25, 2014 06:58 PM2014-06-25T18:58:49+5:302014-06-25T19:00:56+5:30
हावडा-कुर्ला शालीमार एक्सप्रेसच्या शौचालयाच्या भांड्यात संशयास्पदस्थितीत एक स्टीलचा डबा मंगळवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास मिळून आला.
जळगाव : हावडा-कुर्ला शालीमार एक्सप्रेसच्या शौचालयाच्या भांड्यात संशयास्पदस्थितीत एक स्टीलचा डबा मंगळवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास मिळून आला. टी.सी.ने याबाबत रेल्वे प्रशासनाला कळविल्यानंतरदेखील या संशयास्पद डब्याची तपासणीची तसदी न घेतल्याने प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हावडा ते कुर्ला या मार्गावर धावणार्या ट्रेन नंबर १८0३0 या शालीमार एक्सप्रेसच्या ए-वन या एअर कंडीशन डब्यातील प्रवासी एस.गनाकजी यांना भादली रेल्वे स्टेशनदरम्यान शौचालयाच्या भांड्यात स्टीलचा संशयास्पद डबा दिसला. त्यांनी हा प्रकार टी.सी.एच.के.चंदेल यांना सांगितला. चंदेल यांनी हा प्रकार भुसावळ टी.सी.विभागाला कळविला. या ठिकाणी काही वेळ एक्सप्रेस थांबल्यानंतर रात्री ९.४५ वाजता जळगाव रेल्वे स्टेशनवर हा एक्सप्रेस दाखल झाला. चंदेल यांनी कळविल्यानंतर भुसावळ टी.सी. विभागाने जळगाव उपस्टेशन प्रबंधक किंवा आर.पी.एफ यांना याबाबत माहिती दिली नाही. जळगाव स्टेशनवर बराच वेळ चंदेल यांनी डॉग स्कॉड व आर.पी.एफ.च्या जवानांची वाट पाहिली. मात्र तपासणीसाठी शेवटपर्यंत कुणीच न आल्याने काही वेळेनंतर हा एक्सप्रेस पाचोर्याकडे रवाना झाला.