संशयावरून पत्नीला पेटवले
By admin | Published: March 3, 2016 01:38 AM2016-03-03T01:38:07+5:302016-03-03T01:38:07+5:30
पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिल्याप्रकरणी पतीवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाकण : पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिल्याप्रकरणी पतीवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत पती-पत्नी दोघेही गंभीररीत्या भाजले. पत्नी ९५ टक्के व पती ६५ टक्के भाजले आहे. दोघांवरही ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती उपनिरीक्षक राकेश कदम यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना कुरुळी गावच्या हद्दीत सहा ते सात वाजण्याच्या दरम्यान घडली. या घटनेत आशा पोपट खंडागळे (वय २६) व पोपट भरत खंडागळे ( वय ३० वर्षे, दोघेही रा. कुरुळी, ता. खेड, जि. पुणे ) हे गंभीररीत्या भाजले आहेत. याबाबतची अधिक माहिती अशी की, आशा व पोपट यांचे २००७ मध्ये लग्न झाले असून, नवरा नेहमी
पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत होता. २६ फेब्रुवारीला आशा ही आजोबाच्या मयतीला गावाला गेली व दोन दिवसांनी परत आली. तू गावाला इतके दिवस का राहिली? यावरून दोघांची वादावादी झाली व तिच्या चारित्र्याचा संशय घेतला म्हणून पत्नीने अंगावर रॉकेल ओतून घेतले. त्यानंतर पतीने काडीने पेटविले. पत्नीने आरडाओरडा केल्यानंतर शेजारील लोक गोळा झाले.
पेटलेल्या अवस्थेत पत्नीने पतीला मिठी मारून धरल्याने दोघेही गंभीररीत्या भाजले. पत्नीची प्रकृती अत्यंत नाजूक आहे.
याबाबतची फिर्याद पत्नीने दिल्यावरून पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक तृप्ती बोराटे यांनी पंचनामा केला . (वार्ताहर)