सैनिकांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे परिचारक निलंबित
By admin | Published: March 8, 2017 01:30 PM2017-03-08T13:30:12+5:302017-03-08T13:38:10+5:30
भारतीय सैनिकांच्या पत्नींबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने वादात सापडलेले भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत परिचारक यांना अखेर विधान परिषदेतून निलंबित करण्यात आले.
Next
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. ८ - भारतीय सैनिकांच्या पत्नींबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने वादात सापडलेले भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत परिचारक यांना अखेर विधान परिषदेतून निलंबित करण्यात आले आहे. 'एक चौकशी समिती नेमून परिचारक यांचे वक्तव्य तपासण्यात येणार असून तो अहवाल येईपर्यंत परिचारक निलंबित राहतील' असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
परिचारक याच्या विधानाचे तीव्र पडसाद विधान परिषदेत उमटले होते. परिचारक यांचे वक्तव्य अत्यंत घृणास्पद आणि सभागृहाच्या परंपरेला काळिमा फासणारे असून, त्यांना तातडीने निलंबित करावे, अशी जोरदार मागणी भाजपा वगळता सर्वच पक्षांच्या सदस्यांनी केली होती. अखेर त्यांना आज निलंबित करण्यात आले.
'वर्षभर सैनिक गावाकडे नसतो, तो सीमेवर पेढे वाटतो आणि सांगतो काय झाले तर, मला मुलगा झाला’’ असे वादग्रस्त वक्तव्य पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारसभेमध्ये बोलताना परिचारक यांनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर चहूबाजूंनी त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. देशाच्या सैनिकांबद्दल व त्यांच्या पत्नींबद्दल असं वक्तव्य करणारा देशद्रोहीच असू शकतो. जर सैनिकांचे मनोबल व्यवस्थित असेल तरच देश सुरक्षित राहू शकतो या गोष्टींचा विचार न करता राजकारणाची पोळी भाजून घेण्यासाठी सैनिकांचा वापर केला जातो. अशा व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. त्यांच्या आमदारकीचा व इतर सर्व पदांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी पंढरपूर तालुक्यातील माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीयांनी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर आज हे आंदोलन करण्यात आले असून माजी सैनिक आक्रमक झाले आहेत. दरम्यान परिचारक यांना औरंगाबाद येथे महिला आयोगासमोर उपस्थित राहण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती.