शाश्वत विकासाचा ध्यास
By Admin | Published: May 1, 2017 05:18 AM2017-05-01T05:18:32+5:302017-05-01T05:18:32+5:30
राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी धुळे २९ व्या क्रमांकावर आहे. मॉडेल जिल्हा निर्माण करण्याच्या उद्देशाने लुपिन लिमिटेड या कंपनीचे
राजेंद्र शर्मा / धुळे
राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी धुळे २९ व्या क्रमांकावर आहे. मॉडेल जिल्हा निर्माण करण्याच्या उद्देशाने लुपिन लिमिटेड या कंपनीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. देशबंधू गुप्ता यांनी देशबंधू आणि मंजू गुप्ता फाउंडेशनतर्फे ‘भारत परिवर्तन कार्यक्रम’ राबविण्यासाठी धुळे जिल्ह्याची निवड केली.
धुळे जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांचा शाश्वत विकास करण्यासाठी देशबंधू आणि मंजू गुप्ता फाउंडेशनने १ नोव्हेंबर २०१० पासून कामाला सुरुवात केली. सहा वर्षांत ६४५ गावांमध्ये ग्रामीण विकास व उपजीविका सुधार अंतर्गत विविध उपक्रम राबवून सुमारे ८५ हजार कुटुंबांचे आर्थिक जीवनमान उंचाविण्यात यश आले आहे. त्यासाठी २०० प्रशिक्षित कार्यकर्त्यांचे पथक कार्यरत आहे.
कृषी विकास
मुख्य पिकांचे उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी संस्था क्षमता बांधणी, तंत्रज्ञानाची मदत घेण्याबरोबरच शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे व खते उपलब्ध करुन देत आहे.
भात, सोयाबीन व कांद्याच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी १७ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना संस्थेमार्फत सहाय्य करण्यात आले. भाजीपाला, फुलशेती व फळबाग लागवडीद्वारे सुमारे ३१ हजार शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापर्यंत नेण्यात संस्थेला यश मिळाले.
नापिक, चढउताराच्या चार हजार एकरहून अधिक जमिनीचे सपाटीकरण करुन ती पिकाखाली आणण्यात आली. त्याचा ६ हजार शेतकऱ्यांना लाभ झाला.
पशुधन विकास
पशुधन विकासाच्या उपक्रमांतर्गत ३ हजार कुटुंबांनी दुग्ध व्यवसाय सुरु केला. संस्थेने स्वत:ची दुध संकलन केंद्रे उभारली आहेत. नाबार्डच्या सहाय्याने ९ कृत्रिम रेतन केंद्र उभारण्यात आली असून त्याचा ५५ गावांना लाभ होत आहे. १ हजार कुटुंबांनी शेळीपालन व २ हजार कुटुंबानी कुक्कुटपालन असे शेतीपूरक व्यवसाय सुरु केले. कौशल्य विकास : गरीब कुटुंबातील युवक - युवतींसाठी किमान कौशल्य उपक्रम राबविण्यात येत आहे.
आतापर्यंत १७ हजार युवकांना प्रशिक्षण देऊन ५ हजार युवकांनी व्यवसाय सुरु केला आहे. विविध लघु उद्योगासाठी १० ते ४५ हजारांपर्यंत संस्थेकडून वित्त पुरवठा करण्यात येतो. संस्थेने विविध बँकाकडून सुमारे २५ कोटी रुपये उपलब्ध करुन दिले आहेत.
आठवडे बाजार
आठवडी बाजारांची जागा विकसित करण्यात आली.
१६ गावांमध्ये शेतकरी व
छोट्या विक्रेत्यांना बसण्यासाठी ओटे, शेड, पाणी व्यवस्था
आदी मुलभूत सुविधा
उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
जलसंधारण
७८ गावात ८५ सिमेंट बंधारे, ८८ बंधाऱ्यांची दुरुस्ती, ११० नाला खोलीकरणाची कामे केली आहे. त्यामुळे ११ हजार शेतकऱ्यांना शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध झाले. त्यातून १२ हजार एकर जमीन तीनही हंगामात ओलिताखाली आली आहे.
शेतकरी उत्पादक कंपनी
साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे १ हजार शेतकऱ्यांची देशबंधू अॅग्रो रिसर्च सेंटर प्रोड्युसर कंपनी स्थापन केली आहे. त्याद्वारे शेतकरी व ग्राहक थेट जोडण्याचे काम सुरू आहे. कंपनीची दीड कोटींची वार्षिक आर्थिक उलाढाल झाली आहे. शिरपूर व साक्री तालुक्यात उत्पादन कंपन्या स्थापन झाल्या आहेत.