निसर्ग जपला, तरच शाश्वत विकास शक्य - मुख्यमंत्री ठाकरे; माझी वसुंधरा अभियानात अधिकाऱ्यांचा सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 09:34 AM2022-06-06T09:34:59+5:302022-06-06T09:35:44+5:30

Vasundhara Abhiyan : माझी वसुंधरा अभियान हे आपल्याला निसर्गाच्या जवळ घेऊन जाणारे अभियान असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.  प्रास्ताविकाद्वारे प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी माझी वसुंधरा अभियानाच्या दोन टप्प्यांची माहिती देऊन अभियानाच्या वाटचालीचा आढावा घेतला.

Sustainable development is possible only if nature is protected- Chief Minister Uddhav Thackeray; Honoring the officers in my Vasundhara Abhiyan | निसर्ग जपला, तरच शाश्वत विकास शक्य - मुख्यमंत्री ठाकरे; माझी वसुंधरा अभियानात अधिकाऱ्यांचा सन्मान

निसर्ग जपला, तरच शाश्वत विकास शक्य - मुख्यमंत्री ठाकरे; माझी वसुंधरा अभियानात अधिकाऱ्यांचा सन्मान

Next

मुंबई : वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे विविध आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. निसर्गाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे वसुंधरेची जपणूक करून शाश्वत विकासाकडे वाटचाल करावी लागणार आहे. यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपण सर्व जण मिळून ही जबाबदारी पार पाडू या, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केले. 

समृद्ध पर्यावरणासाठीच्या ‘माझी वसुंधरा अभियान २.०’ या अभियानात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या स्थानिक संस्था, विभागीय व जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जऱ्हाड, सदस्य सचिव अशोक शिनगारे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, वसुंधरेची जपणूक करण्याचा आपला जुना संस्कार नव्याने रुजविण्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. विकास कशाला म्हणावा, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. आपण निसर्ग आणि त्यातील वन्यजीव जपत पुढे आलो आहोत, त्यांची उपयुक्तता लक्षात घेता हा वारसा पुढे नेण्याची आवश्यकता आहे. निसर्गाची हाक ऐकण्याची वेळ आली आहे.

माझी वसुंधरा अभियान हे आपल्याला निसर्गाच्या जवळ घेऊन जाणारे अभियान असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.  प्रास्ताविकाद्वारे प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी माझी वसुंधरा अभियानाच्या दोन टप्प्यांची माहिती देऊन अभियानाच्या वाटचालीचा आढावा घेतला. यावेळी शालेय शिक्षणामध्ये प्रगतीसाठी शासन आणि सीईडब्ल्यू तसेच युनिसेफ यांच्यादरम्यान सामंजस्य कराराची देवाणघेवाण करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय भुस्कुटे यांनी केले.

माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत विविध पातळ्यांवर उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था व अधिकाऱ्यांचा सन्मान केला गेला. अमृत शहरांतर्गत नवी मुंबई महापालिकेच्या वतीने आयुक्त अभिजित बांगर, उत्कृष्ट विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे, उत्कृष्ट जिल्हाधिकारी पातळीवरील पुरस्कार राहुल रेखावार, कोल्हापूर, उत्कृष्ट जिल्हा परिषद पातळीवर मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर व आशिष येरेकर, अहमदनगर आदींसह विविध संस्था आणि अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

पर्यावरणात प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे. विकास झालाच पाहिजे; परंतु तो पर्यावरणाची जपणूक करून शाश्वततेकडे जाणारा असणे आवश्यक आहे. मागील काही वर्षांत कमी दिवसांत अधिक पाऊस पडतोय, दरडी कोसळत आहेत. यामुळे होणाऱ्या हानीपासून पुढील पिढीचे आयुष्य सुखकर करण्यासाठी राज्य सरकारने प्रत्यक्ष पावले उचलली आहेत. 
- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

कोणत्याही उपक्रमात लोकसहभाग अंतर्भूत असला की त्यात यश नक्कीच मिळते. पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यासाठी यापुढे २०० कोटी रुपयांचा निधी दिला जाईल. या माध्यमातून माझी वसुंधरा अभियानाद्वारे पर्यावरण रक्षणासाठी काटेकोर उपाययोजना कराव्यात. पंचतत्त्वाच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्यांमध्ये सकारात्मक स्पर्धा असावी, या उद्देशाने यापुढे त्यांच्या प्रत्येक कामासाठी गुण देऊन उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा सत्कार करावा.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री

स्वच्छता, माझी वसुंधरा हे अभियान ही केवळ रोज राबविण्याची बाब नाही, तर ती जनमानसात रुजून आपली संस्कृती बनली पाहिजे. मागील दोन वर्षांच्या कठीण काळात सर्वच अधिकाऱ्यांनी प्रत्येक विभागात केलेल्या उत्कृष्ट कामाचे मोजमाप करता येणार नाही. पर्यावरण दिनानिमित्त त्यांच्या कामाचा सन्मान होत आहे, ही आनंदाची बाब असून अशाच इतरही चांगल्या कामाची जाणीव सर्वांना झाली पाहिजे. पुढील वर्षी पारितोषिकांचा हा कार्यक्रम यापेक्षाही मोठ्या स्वरूपात घ्यावा.     - बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री

शाश्वत विकास साधत नागरिकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी काम करायचे आहे. ग्रीन ग्रोथ हे केवळ पर्यावरणासाठीच नव्हे तर रोजगार निर्मिती आणि आर्थिक चक्र गतिशील राहण्यासाठी देखील आवश्यक आहे. माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून पंचतत्त्वाच्या रक्षणासाठी काम होत आहे. आता गुंतवणुकीबरोबरच शाश्वततेवर भर दिला जात असल्याचे दावोस येथील जागतिक अर्थ परिषदेत जाणवले. राज्याच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाबाबत कौतुकाने बोलले जात असल्याचा अनुभव प्रेरणादायी आहे.     - आदित्य ठाकरे, पर्यावरणमंत्री

Web Title: Sustainable development is possible only if nature is protected- Chief Minister Uddhav Thackeray; Honoring the officers in my Vasundhara Abhiyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.