शाश्वत विकासाचे मॉडेलच उपयुक्त

By admin | Published: November 7, 2016 01:35 AM2016-11-07T01:35:30+5:302016-11-07T01:35:30+5:30

जागतिक स्तरावरील बलाढ्य देशांमध्येदेखील शाश्वत अर्थव्यवस्था आणि सर्वांगीण विकास साधणारी अर्थव्यवस्था याबाबत गोंधळाचे वातावरण दिसते

The sustainable development model is useful | शाश्वत विकासाचे मॉडेलच उपयुक्त

शाश्वत विकासाचे मॉडेलच उपयुक्त

Next

पुणे : जागतिक स्तरावरील बलाढ्य देशांमध्येदेखील शाश्वत अर्थव्यवस्था आणि सर्वांगीण विकास साधणारी अर्थव्यवस्था याबाबत गोंधळाचे वातावरण दिसते. सर्वांच्या नीती टोकाच्या अवस्थेला येऊन ठेपल्या आहेत. अशा वेळी शेतकरी संघटनेचे दिवंगत नेते शरद जोशींनी मांडलेले शाश्वत विकासाचे मॉडेलच उपयोगी पडेल, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी व्यक्त केले.
‘शरद जोशी शोध अस्वस्थ कल्लोळाचा’ या वसुंधरा काशीकर-भागवत लिखित पुस्तकाचे प्रकाशन गडकरी यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि पालकमंत्री गिरीश बापट, साहित्यिक राजीव साने, वसुंधरा काशीकर-भागवत, राजहंस प्रकाशनाच्या संपादक विनया खडपेकर आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेच्या माजी अध्यक्ष व महिला आघाडीच्या माजी आमदार सरोज काशीकर होत्या.
गडकरी म्हणाले, ‘‘शेतीमधील गुंतवणूक कमी करून उत्पादन कसे वाढेल, या दृष्टीने संशोधन होणे गरजेचे आहे. शरद जोशींपासून ते अनेक विचारवंतांनी खुली अर्थव्यवस्था शेतीला तारकच ठरेल, अशी ठाम भूमिका घेतली म्हणून शेतकरी, कष्टकरी जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिली. खुल्या अर्थव्यवस्थेमुळे स्पर्धा निर्माण झाली आणि त्याचा थेट फायदा ग्राहकांना झाला. मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारताना भारताने सर्वसामान्य, गरीब माणूस केंद्रस्थानी ठेवला. भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीचे योगदान २० टक्के एवढे अल्प असले, तरी ग्रामीण आणि कृषी अर्थनीतीच्या सक्षमीकरणाशिवाय सर्वांगीण प्रगती होणे शक्य नाही. शरद जोशी अर्थक्रांतीचा जो विचार मांडत होते, त्या विचारांची आज नितांत आवश्यकता आहे. सिंचनासारख्या आवश्यक घटकांच्या बाबतीतदेखील महाराष्ट्र पिछाडीवर आहे. सिंचन कसे वाढेल, संशोधन कसे वाढेल, जे प्रकल्प निधीअभावी बंद आहेत आणि जे पाण्याशी, शेतीशी संबंधित आहेत ते पूर्णत्वाला कसे नेता येतील, याबाबत केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. महाराष्ट्राला त्यातून ३९ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
सरोज काशीकर म्हणाल्या की, समस्यांचे राजकारण करीत आपली पोळी भाजून घेणारे राजकारणी आम्ही आजवर पाहिले, परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नावर खऱ्या अर्थान पोटतिडकीने काम करणारा शरद जोशींसारखा नेता आम्हाला लाभला हे आमचे भाग्य होते. सरकार स्वत: समस्यांच्या जंजाळात अडकलेले आहे, ते काय आपले प्रश्न सोडवणार आपल्यालाच आपले प्रश्न सोडवावे लागतील, अशा विचारांचे कार्यकर्ते शरद जोशी यांनी घडविले.
वसुंधरा काशीकर-भागवत यांनी शरद जोशी यांच्याशी झालेल्या संवादातून या पुस्तकाचा कसा जन्म झाला, याबाबत सविस्तर विवेचन केले. प्रसन्न जोशी यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार भक्ती हुबळीकर यांनी मानले.

Web Title: The sustainable development model is useful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.