'स्वा. सावरकरांना विनाविलंब ‘भारतरत्न’ मिळावा!'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 03:45 AM2019-06-17T03:45:41+5:302019-06-17T06:37:39+5:30

३१वे सावरकर साहित्य संमेलन कल्याणमध्ये संपन्न

'Sw Savarkar should get Bharat Ratan immediately! | 'स्वा. सावरकरांना विनाविलंब ‘भारतरत्न’ मिळावा!'

'स्वा. सावरकरांना विनाविलंब ‘भारतरत्न’ मिळावा!'

googlenewsNext

कल्याण : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना विनाविलंब भारतरत्न मिळावा, अशी मागणी ३१ व्या सावरकर साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष तथा प्रसिद्ध व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी रविवारी केली. यासंदर्भात मांडलेला ठराव एकमताने मान्य करण्यात आला. भारतरत्न मिळाल्यास अकारण आरोप करून सावरकरांना वादग्रस्त व्यक्तीमत्व बनविणाऱ्या विरोधकांची थोबाडे बंद होतील, असे शेवडे म्हणाले.

येथील पश्चिमेकडील के. सी. गांधी ऑडीटोरियममध्ये हे संमेलन पार पडले. स्वा. सावरकर साहित्य अभ्यास मंडळ मुंबई यांच्यावतीने आयोजित केलेल्या संमेलनाचे अध्यक्षपद शेवडे यांनी भूषविले. स्वागताध्यक्षपदी आमदार नरेंद्र पवार होते. यावेळी केडीएमसीच्या महापौर विनीता राणे, माजी आमदार प्रभाकर संत, साहित्य अभ्यास मंडळाचे अध्यक्ष शंकर गोखले, सुरेश पटवर्धन आदी उपस्थित होते. शेवडे यांनी संमेलनात एकूण सात ठराव मांडले. यात सावरकरांना भारतरत्न मिळावा, या प्रमुख ठरावासह पोर्ट ब्लेअरला वीर सावरकरनगर असे नाव द्यावे, सावरकरांचे लंडन येथील निवासस्थान केंद्र व राज्य सरकारने ताब्यात घेऊन तिथे स्मारक निर्माण करावे, जयोस्तुतेसारखे मंगलगीत अभ्यासक्रमात अंतर्भूत करावे, शालेय अभ्यासक्रमात किमान एक वर्ष सैनिकी शिक्षण बंधनकारक करावे, राष्ट्रपुरूषांची आणि क्रांतीवीरांची कोणत्याही माध्यमातून होणारी बदनामी त्वरीत थांबवावी, राजस्थानच्या राज्य सरकारने सावरकरांच्या नावाने विपर्यस्त माहीती इतिहास पुस्तकात प्रकाशित केली आहे आणि वीर ही उपाधी काढली आहे, तसेच एका वृत्तवाहिनीने खोडसाळपणा करून ऐन सावरकर जयंतीच्या दिवशी अवमानास्पद शीर्षकाचा चर्चात्मक कार्यक्रम आयोजित केला होता, त्याबद्दल अद्याप स्पष्ट क्षमा मागितली नसल्याने त्यांचा निषेध अशा सात ठरावांचा समावेश होता.

संमेलनाच्या प्रारंभी सावरकरांनी रचलेली गीते युवराज ताम्हणकर आणि त्यांच्या सहकलाकारांकडून गाण्यात आली. जयदेव जयदेव शिवराया, तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू, ने मजसी ने परत मातृभूमीला, अनादी मी अनंत मी आणि जयोत्सुते या स्फुर्तीगीतांना उपस्थितांकडून उस्फूर्त दाद मिळाली.

सावरकरांचे विचार घरोघरी पोहोचविण्याचा उद्देश
सावरकरांचे विचार जे राष्ट्रधारक, देशप्रेमी आणि तत्वज्ञानी आहेत. ते समाजापर्यंत तसेच घरोघरी पोहोचविण्याचा उद्देश संमेलनाचे आयोजन करण्यामागचा असल्याचे मत स्वा. सावरकर साहित्य अभ्यास मंडळाचे अध्यक्ष शंकर गोखले यांनी मांडले. १८ वे सावरकर साहित्य संमेलन कल्याणमध्येच पार पडले होते, त्यावेळीही सच्चिदानंद शेवडेच संमेलनाध्यक्ष होते. तेव्हा प्रभाकर संत यांनी पुढाकार घेतल्याची माहीती गोखले यांनी यावेळी दिली.
देशातल्या प्रत्येक समस्येवर सावरकर साहित्यात उपाय आहे. आजच्याघडीला अनेक सावरकर संस्था आहेत, त्यांच्यात समन्वय नाही. सर्वांनी एकत्र येऊन शिखर संंस्था स्थापना करणे गरजेचे आहे, जेणेकरून सावरकरांच्या कार्याची महती संपूर्ण देशभरात पोहोचेल असेही ते म्हणाले.

सावरकर महानायक होते
बालपणापासून स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता म्हणून क ार्यरत असल्याने सावरकरांच्या विचारांनी मी प्रभावित होतो. सावरकर संपूर्ण हिंदूस्थानाला समजले पाहिजेत, ही काळाची गरज आहे. सावरकर खलनायक की नायक असा निरर्थक वाद घातला जातो, पण ते खरे महानायक होते असे प्रतिपादन स्वागताध्यक्ष आमदार नरेंद्र पवार यांनी केले. पुढच्या पिढीपर्यंत सावरकर पोहोचले पाहिजेत, यासाठी शाळांमध्ये जयोत्सुते गीत गायले गेले पाहिजे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Web Title: 'Sw Savarkar should get Bharat Ratan immediately!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.