उद्धव भेटीपूर्वी स्वबळाची भाषा
By admin | Published: June 18, 2017 03:57 AM2017-06-18T03:57:48+5:302017-06-18T03:57:48+5:30
राज्यातील सर्वच मतदारसंघांमध्ये भाजपाची ताकद वाढविण्याचे आदेश मी येथील नेत्यांना दिले आहेत, असे सांगत, २०१९ ची विधानसभा निवडणुकदेखील
विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील सर्वच मतदारसंघांमध्ये भाजपाची ताकद वाढविण्याचे आदेश मी येथील नेत्यांना दिले आहेत, असे सांगत, २०१९ ची विधानसभा निवडणुकदेखील भाजपा स्वबळावरच लढेल, असे संकेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी दिले.
तीन दिवसांच्या मुंबई भेटीवर असलेले शहा हे रविवारी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेणार आहेत. २०१४च्या निवडणुकीत भाजपाचे १४५ जागांचे उद्दिष्ट ठेवले होते, ते हुकले. आता आपले लक्ष्य काय असेल, या प्रश्नावर शहा म्हणाले की, सर्वच मतदारसंघांमध्ये आपली ताकद वाढवा, असे मी मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि इतरांनाही सांगितले आहे. केवळ विधानसभाच नव्हे, तर लोकसभा निवडणुकीसही भाजपा स्वबळावर सामोरे जाईल, असे संकेत शहा यांच्या वक्तव्यावरून मिळाले.
महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकीची शक्यता फेटाळताना ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. स्वत: मुख्यमंत्री फडणवीस यांनी मात्र तीन दिवसांपूर्वीच ते मध्यावधीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे म्हटले होते. याकडे लक्ष वेधले असता शहा पत्रपरिषदेत म्हणाले की, मध्यावधी निवडणूक होणार असे मुख्यमंत्र्यांनी कुठेही म्हटलेले नव्हते. उद्या मध्यावधी झालीच तर आम्ही लढू आणि जिंकूच. पळून थोडीच जाणार! अशी पुस्ती शहा यांनी स्वत: जोडली.
केंद्र सरकारची तीन वर्षांची कामगिरी आणि केंद्राने महाराष्ट्राला या काळात केलेली भरीव आर्थिक मदत याची आकडेवारी त्यांनी दिली. यूपीए सरकारने तेराव्या आयोगात राज्याला दिलेल्या रकमेपेक्षा तब्बल १ लाख ४५ हजार कोटी रुपये मोदी सरकारने अधिक दिले, असा दावा त्यांनी केला. यूपीए सरकारमध्ये अनेक मंत्री स्वत:ला पंतप्रधान समजत होते आणि मनमोहन सिंग यांना पंतप्रधान मानत नव्हते. नरेंद्र मोदी यांनी मात्र तीन वर्षांत पंतप्रधानपदाला प्रतिष्ठा
दिली.
एका अन्य प्रश्नावर त्यांनी दावा केला की काश्मीरमधील परिस्थिती लवकरच नियंत्रणाखाली येईल आणि त्याची सुरुवात झाली आहे.
भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने होण्याचे त्यांनी समर्थन केले. आंतरराष्ट्रीय सामने हे खेळावेच लागतील, असे ते म्हणाले.
या पत्रपरिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे उपस्थित होते.
कोअर कमिटीतही स्वबळ!
भाजपाच्या कोअर कमिटीची बैठकही अमित शहा यांनी घेतली. २०१९ ची विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याच्या तयारीला आतापासूनच
लागा, असे आदेश त्यांनी
या बैठकीत दिल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
सरकार आणि पक्षसंघटना हातात हात घालून चालत असल्याचे आज दिसते, तसेच ते पुढेही चालले पाहिजे. याबाबत कोणतीही तक्रार आपल्याकडे येता कामा नये, अशी तंबीही त्यांनी दिल्याचे समजते.
राजकारणातील जातीयवाद, लांगुलचालन आणि घराणेशाही संपुष्टात आणली. आमच्या सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही. - अमित शहा