‘स्वाभिमानी’चा आज पुण्यात साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 06:17 AM2019-01-28T06:17:22+5:302019-01-28T06:17:41+5:30
थकीत एफआरपीचा प्रश्न; खासदार राजु शेट्टी करणार नेतृत्व
कोल्हापूर : थकीत एफआरपीपोटी साखर कारखान्यांकडील साखर विक्री करून, शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत. या मागणीसाठी आज, सोमवारी सकाळी ११ वाजता खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटना पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. साखर जप्तीचे आदेश काढल्याशिवाय न हलण्याचा निर्णय शेतकºयांनी घेतला आहे.
राज्यातील साखर कारखान्यांनी एफआरपीचे तुकडे केल्याने हजारो कोटींची एफआरपी थकीत आहे. उसाचे गाळप झाल्यापासून १४ दिवसांत शेतकºयांना एफआरपीप्रमाणे पैसे देणे बंधनकारक आहे; पण कारखान्यांनी कायद्याचे तुकडे केल्याचा आरोप ‘स्वाभिमानी’चा आहे. कारखानदार खुशाल कायदा मोडत असताना सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याने शेतकरी अस्वस्थ झाला आहे.
कारखान्यांना आमचे पैसे देता येत नसतील, तर कायद्यातील तरतुदीनुसार साखर आयुक्तांनी साखर जप्त करावी, त्याची विक्री करून शेतकºयांना प्राधान्याने पैसे द्यावेत. या मागणीसाठी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ‘स्वाभिमानी’चे राज्यातील कार्यकर्ते पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयावर धडक देणार आहेत.
गत हंगामातील २७० कोटी थकीत
राज्यातील अनेक कारखान्यांकडे २७० कोटींची गेल्या हंगामातील एफआरपी थकीत आहे. विशेष म्हणजे या कारखान्यांकडे एक किलोही साखर शिल्लक नसल्याने थकीत एफआरपीचा पेच आहे.
मागील अनुभव पाहता उर्वरित एफआरपी मिळण्याची खात्री नाही. गेल्या हंगामातील एफआरपी थकीत आहे; पण त्यांच्याकडे एक किलोही साखर शिल्लक नाही, आता पैसे कसे वसूल करायचे. साखर विक्री करून पहिले शेतकºयांचे पैसे द्यावे, यासाठी ही लढाई आहे.
- राजू शेट्टी, खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटना