“सरकारी पैशातून मतदारांना दिलेली लाच म्हणजे लाडकी बहीण योजना”; कुणी केली टीका?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 15:55 IST2025-02-20T15:53:47+5:302025-02-20T15:55:13+5:30
Mukhyamantri Ladki Bahin Yojana News: लाडकी बहीण योजनेसाठी ४६ हजार कोटींचा खर्च केला जात आहे. याने शेतकरी, आदिवासी, दलित, अल्पसंख्यांकांच्या योजनांना फटका बसला, असा दावा करण्यात आला आहे.

“सरकारी पैशातून मतदारांना दिलेली लाच म्हणजे लाडकी बहीण योजना”; कुणी केली टीका?
Mukhyamantri Ladki Bahin Yojana News: लाकडी बहीण योजनेवरून विरोधकांचे दावे-प्रतिदावे सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसला होता. यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली आणि याची प्रभावी अंमलबजावणी केली. ही योजना महायुतीसाठी विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरली आणि न भूतो असे यश मिळाले. परंतु, यानंतर आता या योजनेची छाननी प्रक्रिया सुरू झाली आहे. यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे.
लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या आणखी ९ लाखांनी कमी होणार आहे. याआधी ५ लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आलं होते. लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा परिणाम होत असून या योजनेतील अपात्र होणाऱ्या महिलांची संख्या आणखी वाढणार आहे. सरकारकडून लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी केली जात आहे. या योजनेतून अपात्र होणाऱ्या महिलांची संख्या १५ लाखांपर्यंत पोहचण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना राजू शेट्टी यांनी यावरून टीकास्त्र सोडले.
सरकारी पैशातून मतदारांना दिलेली लाच म्हणजे माझी लाडकी बहीण योजना
लाडकी बहीण योजना ही सरकारच्या पैशातून मतदारांना दिलेली लाच असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. लाडकी बहीण योजनेमुळे किती योजनांना कात्री लावावी लागली हे सरकारने स्पष्ट करावे, या योजनेमुळे सामाजिक योजनांना लाडकी बहीण योजनेचा फटका बसला. गेल्या ३ वर्षांपासून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे पैसे मिळालेले नाही. शेतकऱ्यांना सिंचनाचे अनुदान प्राप्त झाले नाही. सामाजिक योजनांना कात्री लावायची आणि सवंग प्रसिद्धी मिळेल, अशा योजनांच्या पाठी धावायचे, यात हे सरकार फसले, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली. तसेच लाडकी बहीण योजनेसाठी ४६ हजार कोटींचा खर्च केला जात आहे. त्यामुळे आदिवासी, दलित, अल्पसंख्यांक योजनांना या योजनेचा फटका बसला, असा दावा राजू शेट्टी यांनी केला.
दरम्यान, विक्रमी, पाशवी बहुमत मिळून सरकारला जिल्ह्याचे पालकमंत्री अजून ठरवता येत नाहीत. त्यामुळे हे बहुमत बेगडी आहे. २ महिने झाले तरी सरकारला आपली पकड प्रशासनावर बसवता आलेली नाही. अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यापलीकडे सरकारने काहीच केले नाही. जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. लोकांनी जनतेचा स्वाभिमान विकत घेणाऱ्यापासून सावध रहायला हवे आणि चांगले लोकप्रतिनिधी निवडून द्यायला हवेत, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.