स्वच्छ भारत अभियानात नवी मुंबई देशात तिसऱ्या स्थानी; नाशिक ११ व्या क्रमांकावर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 01:27 PM2020-08-20T13:27:52+5:302020-08-20T13:32:33+5:30
गेल्या वर्षी सातव्या स्थानी असलेल्या नवी मुंबईची तिसऱ्या क्रमांकावर उडी
नवी मुंबई/नाशिक: केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर सर्वेक्षण योजनेत नवी मुंबईनं तिसरा क्रमांक पटकावला आहे. गेल्या वर्षी नवी मुंबई शहर स्वच्छ शहर सर्वेक्षणात सातव्या क्रमांकावर होतं. मात्र यंदा शहरानं तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर पहिल्या १० शहरांमध्ये येण्यासाठी विविध उपाययोजना राबवणाऱ्या नाशिक महापालिकेला ११ व्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं आहे. नाशिक महापालिका राज्यात नवी मुंबईनंतर दुसऱ्या स्थानी आहे.
केंद्र सरकारनं स्वच्छ शहर सर्वेक्षण योजना सुरू केल्यानंतर नाशिक महापालिकेनं सातत्यानं टॉप टेनमध्ये येण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यात यश आलं नव्हतं. गेली दोन वर्षे नाशिक ६४ आणि ६७ व्या क्रमांकावर होतं. त्यामुळे पालिका प्रशासनाचा भ्रमनिरास झाला होता. गेल्या वर्षी केंद्र शासनानं निकषात बदल केले आणि त्रैमासिक मूल्यमापन सुरू झालं. त्यात दोन वेळा नाशिकचा क्रमांक पहिल्या टॉप टेनमध्ये असल्यामुळे महापालिकेच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, फेब्रुवारी महिन्यामध्ये केंद्र सरकारनं स्टार मानांकन जाहीर केलं. त्यात नाशिक महापालिकेला केवळ सिंगल स्टार मिळाल्यामुळे प्रशासनाचा भ्रमनिरास झाला होता.
नाशिकच्या तुलनेत धुळे आणि जळगाव छोटी शहरे असतानादेखील त्यांना थ्री स्टार मानांकन मिळाल्यामुळे महापालिकेने आक्षेप घेतला होता. दरम्यान, आता केंद्र सरकारनं त्याचीही दखल या निकालात घेतली असून नाशिक महापालिकेला अकरावा क्रमांक जाहीर केला आहे. राज्यात नाशिक महापालिका दुसऱ्या स्थानावर असल्याची माहिती महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली.