घुमानला साहित्य महामंडळाची संस्थाच नाही?
By admin | Published: July 6, 2014 12:45 AM2014-07-06T00:45:42+5:302014-07-06T00:45:42+5:30
साहित्य महामंडळाचे ८८ वे साहित्य संमेलन पंजाब येथील संत नामदेवांच्या गावी घुमान येथे आयोजित करण्यात आले आहे. ही अत्यंत आनंदाची बाब आहे आणि साहित्य विश्वानेही महामंडळाच्या या निर्णयाचे स्वागत
महामंडळाचे स्वत:च्याच नियमांकडे दुर्लक्ष : हा तुघलकी कारभार असल्याची चर्चा
राजेश पाणूरकर - नागपूर
साहित्य महामंडळाचे ८८ वे साहित्य संमेलन पंजाब येथील संत नामदेवांच्या गावी घुमान येथे आयोजित करण्यात आले आहे. ही अत्यंत आनंदाची बाब आहे आणि साहित्य विश्वानेही महामंडळाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. साहित्याच्या माध्यमातून दोन प्रांताची जवळीक आणि सलोखा वाढत असेल तर ती आनंदाचीच बाब आहे. पण हे संमेलन आयोजित करताना महामंडळाने पुन्हा स्वत:च्याच घटनेकडे आणि नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. विश्व साहित्य संमेलनाच्या संदर्भात महामंडळ अडचणीत आले असताना, पंजाबला साहित्य संमेलन आयोजित करण्याच्या उत्साहात महामंडळाने सारीच कामे घटनाबाह्य केल्याने त्याची उलटसुलट चर्चाही रंगली आहे.
कुठल्याही संस्थेचा कारभार निश्चित नियमाने चालावा यासाठीच नियम आणि घटना तयार केली जाते. अन्यथा महामंडळाची घटना तयार करण्याचा प्रयत्नच झाला नसता. पण साहित्य क्षेत्रातल्या बुद्धिवंतांनी मात्र बेदरकारपणेच वागायचे असे ठरविले असावे. विश्व साहित्य संमेलनाबाबतचे सारेच वाद सुरूच आहेत. त्यात अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या बाबतीतही यंदा महामंडळाने स्वत:कडे वाद ओढवून घेतला आहे. महामंडळाच्या घटनेप्रमाणे स्थळ निवड समिती महत्त्वाची आहे. यात महामंडळाचे चार प्रतिनिधी, प्रत्येक घटक संस्थेचा एक पदाधिकारी आणि ज्या समाविष्ट व संलग्न संस्थेच्या कार्यक्षेत्रात हे संमेलन होत असेल तर तेथील एक प्रतिनिधी स्थळ निवड समितीत असल्याशिवाय स्थळ निवड समिती पूर्णच होत नाही. घुमानला महामंडळाची समाविष्ट किंवा संलग्न संस्थाच नाही.
कौतिकराव ठाले पाटील यांनीही पहिल्या विश्व साहित्य संमेलनाच्या वेळी अ.भा. मराठी साहित्य संमेलनच विदेशात करण्याचा घाट घातला होता. महामंडळाचे कार्यक्षेत्र भारत आणि भारताबाहेर राहील, या घटनेच्या आधारावर अ.भा. संमेलनही विदेशात होऊ शकते, असा तर्क त्यावेळी लढविण्यात आला होता. पण महामंडळाची कुठलेही घटक, समाविष्ट आणि संलग्न संस्था विदेशात नसल्यामुळेच विश्व साहित्य संमेलनाचा पर्याय स्वीकारण्यात आला. पण घटनात्मक तरतुदी न करता विश्व साहित्य संमेलन आयोजित करण्यात आल्याने हे संमेलनच अडचणीत आले. हा मुद्दा अद्यापही निकालात निघाला नाही. आता घुमानला साहित्य संमेलन आयोजित करताना महामंडळ पुन्हा त्याच मुद्यावर आले आहे.
घुमानला साहित्य संमेलन होणार, ही समस्त मराठी रसिकांसाठी आनंदाचीच बाब असली तरी झालेल्या चुकांची पुनरावृत्ती करण्यातच महामंडळ धन्यता मानते आहे आणि पुन्हा स्वत:वर नामुष्की ओढवून घेते आहे. घटनेप्रमाणे महामंडळाचे कार्यक्षेत्र भारत आणि भारताबाहेर आहेच. पण त्यासाठी महामंडळाच्या नियमाप्रमाणे संमेलन घेण्यासाठी घुमानला संलग्न वा समाविष्ट संस्था असणे गरजेचे आहे. नसल्यास तशी संस्था स्थापन करून नंतरच हे संमेलन तेथे घेणे सर्वथा योग्य आहे. पण महामंडळाने तेथे संलग्न वा समाविष्ट संस्थेबाबत पूर्णत: दुर्लक्ष केल्याने हे संमेलन वैध की अवैध, असा मुद्दा विश्व साहित्य संमेलनाप्रमाणेच गाजणार असल्याचे चिन्ह आहे. संलग्न वा समाविष्ट संस्था घुमानला नसल्याने मुळात नियमाप्रमाणे स्थळ निवड समितीच संपूर्ण होत नाही. त्यामुळे स्थळ निवड समितीपासून आयोजनापर्यंत सारेच अवैध कार्य महामंडळासारख्या साहित्य क्षेत्रात शीर्षस्थ संस्थेने करावे, हे कुणाच्याही तर्काला पटणारे नाही. घटना, नियम काही प्रमाणात माणसाच्या सुविधेसाठी वाकविले वा शिथिल केले जाऊ शकतात हे मान्य आहे. पण संपूर्ण घटनाच नाकारणे हा करंटेपणा आहे.
पहिल्या विश्व साहित्य संमेलनाच्यावेळी चार घटक संस्थेपैकी तीन संस्थांच्या वकिलांनीही याच मुद्यावर अ.भा. मराठी साहित्य संमेलन विदेशात घेणे योग्य नाही, असा सल्ला दिला होता. त्यामुळे अ.भा.ऐवजी विश्व साहित्य संमेलनाचा पर्याय स्वीकारण्यात आला होता. याच्या सर्व प्रती आणि अहवाल खुद्द महामंडळाकडेच उपलब्ध आहे. पण यातून महामंडळाने धडा घेतल्याचे दिसत नाही.