“PM मोदी शिवरायांच्या गुणांचे अनुसरण करतात, हे सांगायला संकोच वाटला नाही”: गोविंददेव गिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 12:49 PM2024-01-24T12:49:54+5:302024-01-24T12:51:05+5:30
Swami Govind Dev Giri Maharaj News: ज्यांची मने कोती असतात, मनात राजकारण भरलेले असते, त्यांच्या तोंडी अशा प्रकारच्या गोष्टी येतात, असा पलटवार गोविंददेव गिरी महाराज यांनी केला.
Swami Govind Dev Giri Maharaj News: अयोध्येत राम मंदिर लोकार्पण झाल्यानंतर पहिल्याच दिवशी ५ लाख भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले. राम मंदिरावरून अद्यापही आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करत पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले. मात्र, यावरून टीका झाली. या टीकेला गोविंददेव गिरी महाराज यांनी उत्तर दिले आहे.
गोविंददेव गिरी महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान मोदी यांची तुलना केली, असा दावा करत महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी टीकास्त्र सोडले होते. यावर गोविंददेव गिरी महाराजांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले आहे. एखाद्या चुकीच्या गोष्टीवर आपण टीका करतो. त्याप्रमाणे सद्गुणांचा गौरव करण्यात कुठलाही संकोच वाटत नाही. ज्यांची मने कोती असतात, मनात राजकारण भरलेले असते, त्यांच्या तोंडी अशा प्रकारच्या गोष्टी येतात, या शब्दांत गोविंददेव गिरी महाराजांनी पलटवार केला.
शिवरायांच्या गुणांचे अनुसरण PM करतात, हे सांगायला संकोच वाटला नाही
माझ्या आयुष्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना कुणाशीही करणार नाही. प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्णानंतर छत्रपती शिवाजी महाराज मला सर्वश्रेष्ठ वाटतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुणांचे अनुसरण काहीजण करतात. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील आहेत. हे सांगण्यात मला कुठलाही संकोच वाटला नाही. कारण, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या जीवनात केलेल्या गुणांचे अनुसरण पंतप्रधान आपल्या जीवनात करताना दिसत आहे, असे गोविंददेव गिरी महाराज यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
नेमके काय म्हणाले होते गोविंददेव गिरी महाराज?
एखादे परिवर्तन आणण्यासाठी एखाद्या महापुरुषाला स्वतःचे जीवन अर्पावे लागते. देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने एक आदर्श व्यक्ती लाभली. छत्रपती शिवाजी महाराज स्वतः मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी श्रीशैलम येथे गेले, तेव्हा त्यांनी तीन दिवसांचा उपवास केला. तीन दिवस शिवमंदिरात राहिले. मला राज्य करायचे नाही, असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात आले. पण ज्येष्ठ मंत्र्यांनी महाराजांची समजूत घातली आणि राज्य करणे ही त्यांची सेवाच आहे, असे सांगितले. समर्थ रामदास स्वामी यांचीही यावेळी आठवण होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत गौरवोद्गार काढताना समर्थ रामदास स्वामी म्हणाले होते की, निश्चयाचा महामेरू। बहुत जनांसी आधारू । अखंड स्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी. आपल्याला असाच एक श्रीमंत योगी प्राप्त झाला आहे, असे स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी म्हटले होते.